

बीजिंग; वृत्तसंस्था : घटत्या लोकसंख्येच्या प्रश्नावर तोडगा म्हणून चीनने महाविद्यालयीन तरुण-तरुणींना आठवडाभराची प्रेमसुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. या सुट्टीचा वापर युगुलांनी प्रेम करण्यासाठी करायचा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या चीनला आता लोकसंख्या नियंत्रण उपायांमुळे सळसळत्या तरुण मनुष्यबळाची वानवा जाणवायला लागली असून, त्यावर मुकाबला करण्यासाठी चीन सरकारने विविध विभागांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यात प्रेमसुट्टीचा विषयही सुचविण्यात आला होता. ही सूचना स्वीकारण्यात आली आहे.
एनबीसी या वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमधील नऊ महाविद्यालयांनी एप्रिल महिन्यात एक आठवड्याची प्रेमसुट्टी जाहीर केली आहे. महाविद्यालयात शिकणार्या तरुण-तरुणींना प्रेमात पडण्याचे व प्रेम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय मिआनयांग महाविद्यालयाने मार्च महिन्यात सुट्ट्या जाहीर करताना रोमान्सवर भर देत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तरुणांनी निसर्ग आणि आयुष्यावर प्रेम करण्यासाठी या सुट्ट्यांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना या सुट्ट्यांच्या काळात येणारे अनुभव, आपल्यात होत असलेले बदल टिपण्यासाठी डायरी लिहिण्याचा गृहपाठही देण्यात आला आहे.