पुढारी ऑनलाईन: तुर्की-सीरियामध्ये झालेल्या शतकातील सर्वात विनाशकारी भूकंपात आतापर्यंत २८ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला १२२ तास उलटून गेल्यानंतरही कोसळलेल्या इमारतींच्या ढिगा-या खालून एकापाठोपाठ एक मृतदेह बाहेर काढले जात आहेत. दुर्घटनेतील जखमींच्या संख्येस मृतांचा आकडाही वाढत असल्याचे बचाव यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. स्थानिक वृत्तसंस्थांनी याबाबत माहिती दिली आहे.
न्यूज एजन्सी अनालुडूने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीतील विविध आठ प्रांतात भूकंपाचे झटके बसले. यात सर्वाधिक तडाखा दक्षिण तुर्कीला बसला. या विनाशकारी भूकंपानंतर येथील गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. येथील पीडित लोकांची लुटालूट आणि फसवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याप्रकरणी विविध प्रांतातील ४२ लोकांनी अटक करण्यात आली आहे. येथील सहा जणांना फोनच्या माध्यमातून गांझियाटेप शहरातील एका पीडितेला धमकी देण्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
या शक्तीशाली भूकंपानंतर कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखालून वयोवृद्ध व्यक्तींना बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापनाला यश आले. शक्तीशाली भूकंपानंतर १२२ तासांनंतर तीन महिला जिवंत राहणे हा एक चमत्कार मानला जात आहे. त्यापैकी एक महिला ७० वर्षीय आहे जिचे नाव मेनेक्से तबक आहे. दुसरी ५५ वर्षीय मसाल्लाह सिसेक आणि तिसरी महिला ४० वर्षीय झेनेप कहरामन ही आहे.
भारतातून तुर्कस्तानला मोठ्या प्रमाणात मदत सामग्री पाठवली जात आहे. लष्कर आणि एनडीआरएफ टीमनंतर आता भारतातील लोक कडाक्याच्या थंडीत ब्लँकेटचे वाटप देखील करत आहेत. तुर्कीचे राजदूत फिरात सनेल यांनी १०० ब्लँकेट तुर्कीला पाठवल्याचे ट्विट करत, त्यांनी पत्रात 'वसुधैव कुटुंबकम'चा संदेशही शेअर केला आहे.
तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या सध्या 28,000 च्या वर गेली आहे. या शक्तीशाली भूकंपानंतर भूकंपबळींची संख्या ही यापेक्षाही दुप्पट किंवा अधिक होईल, असे संयुक्त राष्ट्रांचे मदत प्रमुख मार्टिन ग्रिफिथ्स यांनी म्हटले आहे. शनिवारी स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मृतांच्या संख्येबद्दल सांगितले.