

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : मृत्यू अटळ आहे. मृत्यूबद्दलचे गूढ आदीकाळापासून सगळ्यांना वाटत आलेले आहे, ते उलगडण्याचा प्रयत्नही तेव्हापासूनच सुरू आहे. प्रत्यक्ष अमरत्व संपादन करूनही मृत्यू हाच शाश्वत असल्याचे सत्य प्रस्थापित करणार्या अनेक सुरस कथा भारतासह जगभरातील मिथकांमध्ये वाचायला मिळतात. विज्ञानाने आजवर बरीच मजल मारलेली आहे. आरोग्य विज्ञानही फार पुढे गेले आहे. बहुतांश आजारांची कारणे, उपचार आरोग्य विज्ञानाच्या टप्प्यातही आले आहेत. आता वय थांबविण्याचे, वयाच्या उलट गणनेचे प्रयोग सुरू आहेत.
अमेरिकेत एका उद्योजकावर (ब्रायन जॉन्सन) सुरू असलेला रिव्हर्स एजिंगचा (वयाची उलट गणना) एक प्रयोग एका अर्थाने यशस्वी ठरला आहे. यात या उद्योजकाच्या विविध अवयवांचे सरासरी वय 5 वर्षांनी कमी झालेले आहे. वयाची चाळिशी ओलांडलेला हा उद्योजक दिसायलाही 18 वर्षांचा तरुण दिसू लागला आहे. मनुष्य अमर होऊ शकेल, असे तंत्र शोधून काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयोगातील उत्साहही या यशाने वाढीला लागलेला आहे. अॅमेझॉनचे जेफ बेझोस, गुगलचे लॅरी पेज आणि फेसबुकचे मार्क झुकेरबर्गही या प्रयोगांत कोट्यवधी रुपये ओतत आहेत. पुन्हा हे असे काही तीनच लोक नाहीत, तर जगातील सर्वाधिक श्रीमंतांमध्ये समाविष्ट असलेल्या 14 धनकुबेरांनीही आजवर मृत्यूला मात देण्यासाठी तसेच अमर होण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रयोगांवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. कॅलिफोर्निया लाईफ (कॅलिको लॅब्स), ल्टोस लॅब, मॅथ्युस्लेह फाऊंडेशन, अल्कोर लाईफ एक्स्टेन्शन फाऊंडेशन, एलिसन मेडिकल फाऊंडेशन या कंपन्या तसेच संस्था अँटी एजिंग तसेच अमरत्वावर संशोधन करत आहेत. जगभरातील अब्जाधीश त्यांत गुंतवणूक करत आहेत, अगर त्यांना निधी देत आहेत.
45 वर्षांचे जॉन्सन, पण त्यांचे हृदय 37, त्वचा 28, फुफ्फुस 18 चे, दिसतातही 18 चे!
2017 मधील एका संशोधनातील निष्कर्षांनुसार, बहुपेशीय सजीवांचे वय रोखणे अशक्य आहे. कारण पेशींचे कार्य बळजबरी नियंत्रित केले तर कर्करोगासारखे आजार रुग्णाला जडतील आणि त्याचा मृत्यूची शक्यता बळावेल.
2022 मानवी त्वचेला 30 वर्षांपर्यंत मागे आणले जाऊ शकते, असा दावा सन 2022 मधील एका पिजेनेटिक्स रिसर्चच्या अहवालातून करण्यात आला होता. म्हणजे उपचाराअंती एक 70 वर्षांच्या व्यक्तीची त्वचा एका 40 वर्षांच्या व्यक्तीप्रमाणे करता येऊ शकते.
2023 हार्वर्ड मेडिकल स्कूलचे डॉ. सिंक्लेअर यांनी तयार केलेल्या अँटी एजिंग औषधांचा तसेच पिजेनिक एडिटिंग व डीएनए टार्गेटिंग तंत्राचा प्रयोग उंदरांवर केला. म्हातार्या अंध उंदराला द़ृष्टीही आली आणि तो तरुण बनला.
एका पेशीपासून (बिजांड) जीवनाची सुरुवात होते. ती विभाजित होते आणि दोन पेशी तयार होतात. दोनाच्या चार हा क्रम सुरू राहातो. याला सेल सायकलिंग म्हणतात. अनेक पेशींची ऊती होते.
ऊतींचा अवयव : अनेक अवयव मिळून शरीर जिवंत ठेवतात. एका सुद़ृढ शरीरात 37.3 ट्रिलियन पेशी असतात. पेशींचे विभाजन जास्तीत जास्त 50 वेळा होऊ शकते. म्हणून वय वाढते तसे या चक्रात अडथळे निर्माण होतात.