हुकूमशहा ते देशद्रोही... जाणून घ्‍या परवेज मुशर्रफांच्‍या कारकीर्दीतील महत्त्‍वाच्‍या घडामोडी | पुढारी

हुकूमशहा ते देशद्रोही... जाणून घ्‍या परवेज मुशर्रफांच्‍या कारकीर्दीतील महत्त्‍वाच्‍या घडामोडी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन झाल्‍याचे वृत्त पाकिस्‍तानी माध्‍यमांनी दिले आहे. दुबई येथे रुग्‍णालयात त्‍यांनी अखेरचा श्‍वास घेतला. ते ७९ वर्षांचे होते. मागील काही दिवस ते आजारी होते. परवेझ मुशर्रफ यांचा जन्‍म ११ ऑगस्‍ट १९४३ मध्‍ये दिल्‍लीतील दरियागंज परिसरात झाला. १९४७ मध्‍ये भारताची फाळीनंतर काही दिवसांनी Pervez Musharrf यांचे कुटुंबीय किस्‍तानला रवाना झाले. १२ ऑक्टोबर १९९९ रोजी नवाझ शरीफने मुशर्रफ यांची लष्करप्रमुखपदावरुन हकालपट्‍टी केली. यानंतर मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ विरुद्ध लष्करी बंड पुकारत देशाची सत्ता हाती घेतली होती. जाणून घेवूया मुशर्रफ यांच्‍या  कारर्कीदीतील महत्त्‍वाच्‍या घडामोडी…

Pervez Musharrf : लष्‍कर प्रमुख ते द्रेशद्रोही खटल्‍यातील आरोपी

  • मुशर्रफ हे १९९८ मध्‍ये पाकिस्‍तानचे लष्‍कर प्रमुख झाले.
  • १२ ऑक्टोबर १९९९ रोजी  परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ सरकार उलथून टाकले.
  • जून २००१: मुशर्रफ यांनी स्वतःला देशाचे अध्यक्ष घोषित केले.
  • ३ नोव्‍हेंबर २००७ : परवेझ मुशर्रफ यांनी १९७३ ची घटना निलंबित करून देशात आणीबाणी लागू केली.
  • २८ नोव्‍हेंबर २००७ : मुशर्रफ यांचा राजकारणात प्रवेश केला. जनरल अशफाक कियानी यांच्याकडे लष्कराची कमान सोपवली.
  • २९ नोव्‍हेंबर २००७ : पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
  • १५ डिसेंबर २००७ : मुशर्रफ यांनी पाकिस्‍तानमधील आणीबाणी उठवली. ४२ दिवस आणीबाणीच्या काळात घेतलेल्या निर्णयांचे कायद्‍यात रुपांतर केले.
  • १८ ऑगस्‍ट २००८ : महाभियोग टाळण्यासाठी ९ वर्षांच्या पदानंतर राजीनामा दिला.
  • ३१ जुलै २००९ : पाकिस्‍तानच्‍या सर्वोच्च न्यायालयाने 3 नोव्हेंबर २००७ ला लागू केलेली आणीबाणी घटनाबाह्य असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. तसेच मुशर्रफ यांच्‍याकडून याबाबत उत्तरही मागविण्‍यात आले.
  • ६ ऑगस्‍ट २००९ : उत्तर देण्यास नकार देत मुशर्रफ यांचे इंग्लंडला पलायन
  • ८ जून २०१० : इंग्‍लंडमध्‍ये वास्‍तव. ‘एपीएमएल’ पक्षाची स्‍थापना. पक्षाध्‍यक्षपदी स्‍वत:च्‍या नावाची घोषणा.
  • २४ मार्च २०१३ : मुशर्रफ सार्वत्रिक निवडणुकांसाठी पाकिस्तानात परतले.
  • २९ मार्च २०१३ : सिंध उच्च न्यायालयाने मुशर्रफ यांच्या जामिनाची मुदत वाढवली. तसेच न्‍यायालयाच्‍या परवानगी शिवाय देश सोडण्‍यावर निर्बंध
  • ५ एप्रिल २०१३ : पाकिस्‍तान सर्वोच्च न्यायालयाने मुशर्रफ यांच्यावरील देशद्रोहाच्या खटल्याची सुनावणी करण्यास सहमती दर्शवली.
  • ७ एप्रिल २०१३: सरन्यायाधीश इफ्तिखार मोहम्मद चौधरी यांनी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठातून स्वत:ला माघार घेतली.
  • १८ एप्रिल २०१३ : जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुशर्रफ इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातून फरार झाले.
  • १९ एप्रिल २०१३ : मुशर्रफ न्‍यायालयासमोर शरण आले. इस्लामाबादमधील चक शहजाद येथील त्यांचे फार्महाऊस सील करण्यात आले. त्याचे कारागृहात रूपांतर झाले.
  • ३० एप्रिल २०१३ : पेशावर उच्च न्यायालयाने मुशर्रफ यांना सिनेट आणि नॅशनल असेंब्लीच्या निवडणुका लढवण्यास मनाई केली.
  • २४ जून २०१३ : पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्‍तान संसदेत स्‍पष्‍ट केले की, मुशर्रफ यांच्यावर खटला चालवला जाईल.
  • १८ नोव्‍हेंबर २०१३ : पाकिस्‍तान सर्वोच्च न्यायालयाने मुशर्रफ यांच्याविरुद्धच्या देशद्रोहाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीश इफ्तिखार चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष न्यायाधिकरण स्थापन करण्यास सहमती दर्शवली.
  • २ जानेवारी २०१४ : न्यायालयात नेत असताना मुशर्रफ यांनी हृदयविकाराचा त्रास होत असल्‍याचा दावा केला. त्‍यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  • १८ फेब्रुवारी २०१४ : सलग २२ सुनावणीसाठी गैरहजर राहिलेले मुशर्रफ अखेर न्यायालयात हजर झाले; पण त्यांच्यावर आरोप निश्चित झाले नाहीत.
  • १४ मे २०१४ : मुशर्रफ यांचा २००७ मध्ये बेकायदेशीरपणे आणीबाणी लादण्याशी संबंध जोडणारे पुरावे असल्‍याचे न्‍यायालयात सांगण्‍यात आले.
  • २२ डिसेंबर २०१५ : लष्करप्रमुख अश्फाक परवेझ कयानी आणि इतर नेत्यांशी सल्लामसलत करून आणीबाणी लादल्याचh दावा मुशर्रफ यांनी केला.
  • १८ मार्च २०१६ : मुशर्रफ वैद्यकीय कारणास्तव दुबईला रवाना.
  • ११ मे २०१६ : विशेष न्यायालयाने मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या खटल्यात फरार घोषित केले.
  • १० नोव्‍हेंबर २०१७ : मुशर्रफ यांनी पाकिस्तान अवामी इत्तेहाद या 23 पक्षांची महाआघाडी स्थापन करण्याची घोषणा केली.
  • २९ मार्च २०१८ : न्यायमूर्ती याह्या आफ्रिदी यांनी सुनावणीतून माघार घेतल्यानंतर विशेष न्यायालयाचे खंडपीठ विसर्जित करण्यात आले.
  • ७ एप्रिल २०१८ : सरन्यायाधीश मियां साकिब निसार यांनी पुन्हा सुनावणीसाठी खंडपीठ स्थापन केले.
  • ७ जून २०१८ : सर्वोच्च न्यायालयाने मुशर्रफ यांना न्यायालयात हजर राहण्याच्या अटीवर निवडणुकीत भाग घेण्याची परवानगी दिली.
  • 30 जुलै २०१८ : मुशर्रफ देशद्रोहाचा खटला फिर्यादी प्रमुखांनी मागे घेतला.
  • २० ऑगस्‍ट २०१८ : आपल्या जीवाला धोका असल्याचे कारण देत मुशर्रफ यांनी न्यायालयात हजर होण्यापूर्वी राष्ट्रपती दर्जाची सुरक्षा मागितली.
  • ३१ मार्च २०१९ : मुशर्रफ यांनी 2 मे रोजी न्यायालयात हजर राहावे, अन्यथा ते स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार गमावतील, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
  • ८ ऑक़्‍टोबर २०१९ : विशेष न्यायालयाने देशद्रोहाचा खटल्‍याची दररोज सुनावणी घेण्‍याचा निर्णय घेतला
  • १७ डिसेंबर २०१९: विशेष न्यायालयाने मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावली होती
  • मुशर्रफ उपचारासाठी २०१६ मध्‍येच दुबईला रवाना झाले होते. अखेर 5 फेब्रुवारी 2023 रोजी त्‍यांचे रुग्‍णालयात उपचार सुरु असतानच दुबईत निधन झाले.

Pervez Musharrf : आत्‍मचरित्रात दिली होती ‘स्‍वप्‍नभंगा’ची कबुली

मुशर्रफ हे १९९८ मध्‍ये पाकिस्‍तानचे लष्‍कर प्रमुख झाले. लष्‍कर प्रमुख म्‍हणून सूत्रे हाती घेतल्‍यानंतर त्‍यांनी भारताविरोधात कारगिल युद्धाचा कट रचला. १९९९ साली पाकिस्‍तानी सैन्याला कारगील युद्धामध्ये भारताकडून पराभूत व्हावे लागले. या पराभवानंतर मुशर्रफ व तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ ह्यांच्या दरम्यान मतभेद निर्माण झाले होते. मी कारगिल जिंकण्‍याची शपथ घेतली होती. मात्र नवाज शरीफ यांच्‍यामुळे माझा स्‍वप्‍नभंग झाला, अशी कबुलीच मुशर्रफ यांनी त्‍यांच्‍या ‘इन द लाइन ऑफ फायर’ या आपल्‍या आत्‍मचरित्रात दिली होती.

 

 

 

 

Back to top button