जम्मू- काश्मीरमध्ये घातपात घडवणारा सरकारी शाळेतील शिक्षक अटकेत | पुढारी

जम्मू- काश्मीरमध्ये घातपात घडवणारा सरकारी शाळेतील शिक्षक अटकेत

जम्मू; पुढारी वृत्तसेवा :  दिवसा सरकारी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करणारा आणि उरलेल्या वेळात चक्क दहशतवादी कारवाया करणार्‍या एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून परफ्युम बॉम्ब हस्तगत करण्यात आला आहे.

जम्मूत पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले की, जम्मूच्या रियासी येथील आरिफ अहमद याला अटक करण्यात आली असून तो सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी करतो. उर्वरित वेळात तो लष्कर ए तोयबासाठी घातपाती कारवाया करतो. कटरा येथील बसवरील हल्ला आणि नरवालमध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात तो सहभागी होता. सारे पुरावे हाती लागल्यावर त्याचा शोध सुरू झाला. 11 दिवसांच्या मोहिमेनंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

रियासी येथील कासीम आणि त्याचा काका कमरुद्दीन यांच्या इशार्‍यावर तो घातपाती कारवाया करायचा. शास्त्रीनगर, कटरा आणि नरवाल येथील स्फोटांत तो सहभागी होता. नवनवीन प्रकारचे आयईडी बनवण्यात त्याचा हातखंडा मानला जातो. त्याला अटक केली तेव्हा पोलिसांनी त्याच्याकडून परफ्युम बॉम्ब हस्तगत केला आहे. महासंचालक दिलबाग सिंह म्हणाले की, आतापर्यंत साधे आयईडी, स्टिकी बॉम्ब आणि टायमर असलेले आयईडी बघितले होते; पण हा परफ्युम बॉम्ब नवीन प्रकार आहे. परफ्युमच्या बाटलीत स्फोटके भरलेली असतात. त्याचा स्प्रेचा खटका दाबला की स्फोट होतो. पोलिसांनी अजून त्या बॉम्बची तपासणी केलेली नाही.

Back to top button