हुश्श…अखेर प्राणघातक किरणोत्सर्गी कॅप्सूल सापडली! जाणून घ्‍या ऑस्‍ट्रेलियात काय घडलं होते? | पुढारी

हुश्श...अखेर प्राणघातक किरणोत्सर्गी कॅप्सूल सापडली! जाणून घ्‍या ऑस्‍ट्रेलियात काय घडलं होते?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तांदळाच्या दाण्याइतक्या आकाराच्या एका छोट्यासा कॅप्सूल हरवली आणि या घटनेमुळे ऑस्ट्रेलियामध्‍ये खळबळ माजली होती. कारणही तसेच होते, हे छोटे किरणोत्सर्गी कॅप्सूल ( Radioactive Capsule ) प्राणघातक होते. यामध्‍ये असणार्‍या ‘सिजियम-137’ नावाच्या पदार्थामुळे त्‍याला स्पर्श करणेही जीवावर बेतणारे होते. त्‍यामुळेच याचा शोधण्यासाठी कॉमनवेल्थ देशांची मदत मागितली गेली होती. अखेर ऑस्ट्रेलियन महामार्ग स्कॅन करणार्‍या अधिकार्‍यांना रस्त्याच्या कडेला ही कॅप्‍सुल सापडली. गवताच्‍या गंजीमध्‍ये सुई शोधण्‍याचा या प्रयत्‍नाला यश आल्‍याने ऑस्‍ट्रेलिया सरकारचा जीव भांड्यात पडला आहे.

Radioactive Capsule : नेमकं काय घडलं होते?

छोटे किरणोत्सर्गी कॅप्सूल १० जानेवारी रोजी एका पॅकेजमध्ये ठेवण्यात आले होते. ते पर्थ येथे घेवून जाण्‍यासाठी १२ जानेवारी रोजी कंत्राटदाराने बाहेर काढले. हा ट्रक 12 जानेवारीला खाणीतून बाहेर पडला आणि तो 16 जानेवारीला पर्थला पोहोचणार होता. मात्र तपासणीत कॅप्‍सूल गहाळ झाल्‍याचे निदर्शनास आले. कॅप्सूलच्या केसचे एक बोल्ट या प्रवासात कुठे तरी सैल झाला. यामुळेचे  बोल्टच्या छिद्रातून घरंगळून  कॅप्सूल बाहेर पडली, अशी माहिती प्रशासनाने दिली होती.

‘सिजियम-137’ पदार्थामुळे कॅप्सूलला स्पर्श करणे प्राणघातक

मेटल डिटेक्टर आणि रेडिओअ‍ॅक्टिव्ह उपकरणांच्या मदतीने 8 मिलीमीटर लांब आणि 6 मिलीमीटर रुंदीच्या या छोट्याशा कॅप्सूलला 36 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर शोधले जात होते. ( Radioactive Capsule ) हे कॅप्सूल रेडिओअ‍ॅक्टिव्ह पदार्थाचे असल्याने ते अत्यंत घातक ठरू शकत होते. ‘सिजियम-137’ नावाच्या या पदार्थाला स्पर्श करणेही प्राणघातक ठरू शकते. त्‍यामुळे कॅप्सूलसारखी वस्तू आढळल्यास त्यापासून दूर राहावे, इशारा प्रशासनाने नागरिकांना दिला होता.

अखेर प्रशासनाच्‍या शोधमोहिमेला यश

आपत्कालीन सेवा मंत्री स्टीफन डॉसन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “किरणोत्सर्गी कॅप्सूल शोधणे हे अत्‍यंत आव्‍हानात्‍मक काम होते. विशेष रेडिएशन डिटेक्शन युनिट्ससह महामार्गाचा युद्‍धपातळीवर शोध सुरु करण्‍यात आला. कॅप्सूलजवळ न जाण्याचा इशारा नागरिकांना देण्‍यात आला होता. अखेर आज ( दि. १ ) सकाळी 11:13 वाजता न्‍यूमन या शहराच्‍या दक्षिणेला महामार्गापासून दोन मीटर अंतरारवर रेडिएशन तपासणी उपकरणाच्‍या मदतीने हे कॅप्‍सूल शोधून काढले. आता न्यूमनमधून कडेकोट सुरक्षेत एका कंटेनरमधून ते सुरक्षित स्‍थळी हलविण्‍यात येणार आहे.” सुदैवाने कॅप्सूल निर्जनस्‍थळी पडले होते. त्‍यामुळे तिच्या संपर्कात कोणी आले नाही आणि मोठा धोका टळला, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

 

 

Back to top button