पाकिस्तानमधील आत्‍मघाती हल्‍ल्‍यातील मृतांची संख्‍या ९० वर | पुढारी

पाकिस्तानमधील आत्‍मघाती हल्‍ल्‍यातील मृतांची संख्‍या ९० वर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्तानमधील पेशावर शहरात पोलिस लाईन्समधील मशिदीत सोमवारी ( दि. ३० ) झालेल्‍या आत्‍मघाती हल्‍ल्‍यातील मृतांची संख्‍या ९० झाली आहे. या हल्‍ल्‍यात १२५ जणांहून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. त्‍यामुळे मृतांची संख्‍या वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. मृतांमध्‍ये पोलिस कर्मचार्‍यांची संख्‍या सर्वाधिक आहे. त्‍यामुळे पोलिसांना लक्ष्य करण्याच्या उद्देशानेच हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. ( Peshawar’s Police Lines blast )

मशिदीत झालेल्‍या आत्‍मघाती हल्‍यानंतर लष्कराने परिसराला वेढा घातला आहे. ही मशीद असलेल्या ठिकाणी नेहमीच कडक पोलिस बंदोबस्त असतो. लष्‍कराच्‍या दहशतवादविरोधी दलाचे मुख्यालय याच ठिकाणी आहे. एवढी कडकोट सुरक्षा भेदून हा हल्ला झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. . ( Peshawar’s Police Lines blast )

पोलिस लाईन्समध्ये उपस्थित लोकांनी सांगितले होते की , हा स्फोट अत्यंत शक्तिशाली होता. त्याचा आवाज 2 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर धूळ आणि धुराचे लोट दिसत होते. लोकही जीवाच्या आकांताने सैरावैरा पळत होते.नमाजच्या वेळी मशिदीत 500 ते 550 लोक उपस्थित होते. आत्‍मघाती हल्लेखोर मधल्या रांगेत होता. मशिदीत प्रवेशाकरिता गेट पास दाखवावा लागत असल्याने तो पोलिस लाईन्समध्ये कसा पोहोचला, हे स्पष्ट झालेले नाही. स्फोटात मशीद कोसळली असून, अनेक लोक ढिगार्‍याखाली गाडले गेले आहेत.

Peshawar’s Police Lines blast : ‘टीटीपी’ने स्वीकारली जबाबदारी

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या दहशतवादी संघटनेला अफगाणिस्तानचा पाठिंबा असल्याचे मानले जाते. त्यामुळेच या संघटनेवरून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात वितुष्ट आले आहे. दरम्यान, यापूर्वी गेल्यावर्षी 23 डिसेंबरला इस्लामाबद येथे आत्मघाती हल्ला होऊन त्यात एक पोलिस ठार, तर 10 जण गंभीर जखमी झाले होते.

हेही वाचा : 

 

Back to top button