पाकिस्तानमध्ये मशिदीवरील आत्मघाती हल्ल्यात 52 ठार | पुढारी

पाकिस्तानमध्ये मशिदीवरील आत्मघाती हल्ल्यात 52 ठार

पेशावर : पाकिस्तानातील पेशावर शहरात पोलिस लाईन्समधील मशिदीत सोमवारी करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यात 52 जण ठार, तर 125 हून अधिक जखमी झाले आहेत. ठार झालेले बहुतांश लोक पोलिस असून, पोलिसांना लक्ष्य करण्याच्या उद्देशानेच हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.

जखमींपैकी 90 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यानंतर लष्कराने परिसराला वेढा घातला आहे. ही मशीद असलेल्या ठिकाणी नेहमीच कडक पोलिस बंदोबस्त असतो. दहशतवादविरोधी दलाचे मुख्यालय याच ठिकाणी आहे. तरीदेखील एवढी कडकोट सुरक्षा भेदून हा हल्ला झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिस लाईन्समध्ये उपस्थित लोकांनी सांगितले की, हा स्फोट अत्यंत शक्तिशाली होता. त्याचा आवाज 2 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर धूळ आणि धुराचे लोट दिसत होते. लोकही जीवाच्या आकांताने सैरावैरा पळत होते.

हल्लेखोर होता मधल्या रांगेत

नमाजच्या वेळी मशिदीत 500 ते 550 लोक उपस्थित होते. फिदाईन हल्लेखोर मधल्या रांगेत होता. मशिदीत प्रवेशाकरिता गेट पास दाखवावा लागत असल्याने तो पोलिस लाईन्समध्ये कसा पोहोचला, हे स्पष्ट झालेले नाही. स्फोटात मशीद कोसळली असून, अनेक लोक ढिगार्‍याखाली गाडले गेले आहेत.

‘टीटीपी’ने स्वीकारली स्फोटाची जबाबदारी

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या दहशतवादी संघटनेला अफगाणिस्तानचा पाठिंबा असल्याचे मानले जाते. त्यामुळेच या संघटनेवरून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात वितुष्ट आले आहे. दरम्यान, यापूर्वी गेल्यावर्षी 23 डिसेंबरला इस्लामाबद येथे आत्मघाती हल्ला होऊन त्यात एक पोलिस ठार, तर 10 जण गंभीर जखमी झाले होते.

Back to top button