पाकिस्तानात पेट्रोल 249 रुपये लिटर! | पुढारी

पाकिस्तानात पेट्रोल 249 रुपये लिटर!

इस्लामाबाद; वृत्तसंस्था :  पाकिस्तानात पेट्रोल एका दिवसात 16 टक्के महाग झाले असून, 214 रुपयांत एक लिटर मिळत असलेले पेट्रोल 249 रुपयांवर गेले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 35 रुपयांनी वाढवल्या आहेत, असे अर्थमंत्री इसहाक डार यांनी रविवारी सांगितले. पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी पाकिस्तानातील आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडले आहेत. डिझेलची किंमत 262 रुपये लिटर, तर रॉकेलची किंमत 187 रुपये लिटर झाली आहे. पेट्रोलचे दर लिटरमागे 50 ते 80 रुपयांनी वाढतील, अशी अफवा तत्पूर्वी पसरल्याने अनेक पेट्रोल पंपांवर लांब रांगा लागल्या होत्या.

रुपयाही पडला

सतत दुसर्‍या दिवशी पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत 11.17 रुपयांनी घसरला आहे. काहीही आयात करायचे तर डॉलरच्या मोबदल्यात 266 रुपये पाकला द्यावे लागतील. याआधी 26 जानेवारीला डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी चलनात विक्रमी 24 रुपयांची घसरण झाली होती.

…तर पाक दिवाळखोर

विदेशी कर्जात बुडालेल्या पाकिस्तानला 72 हजार कोटी रुपयांचा हफ्ता द्यायचा आहे. त्यासाठीही पाकला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत हवी आहे. नाणेनिधीची मदत मिळाली नाही, तर पाक दिवाळखोरीत निघेल. नाणेनिधीचे कर्ज मिळावे म्हणून पेट्रोलियम उत्पादनांवरील अनुदान रद्द करून सामान्यांवर महागाईचे ओझे टाकण्याखेरीज पाकसमोर पर्याय उरलेला नाही.

Back to top button