ब्रिटनच्या आरोग्याची मदार भारतीय डॉक्टरांवर | पुढारी

ब्रिटनच्या आरोग्याची मदार भारतीय डॉक्टरांवर

लंडन, वृत्तसंस्था : वेतनवाढीच्या मागणीसाठी ब्रिटनच्या सरकारी आरोग्यसेवेत असलेले डॉक्टर आणि अन्य कर्मचारी संपावर असल्याने सध्या या देशातील आरोग्याची मदारही भारतीय डॉक्टर आणि परिचारिकांवर आहे. ब्रिटनच्या सरकारी आरोग्यसेवेत एकूण 1 लाख 15 हजार भारतीय डॉक्टर कार्यरत आहेत.

त्यात भारतात वैद्यकीय शिक्षण घेतलेले 60 हजार डॉक्टर आहेत. उर्वरित डॉक्टर हे भारतीय मूळ असलेले ब्रिटिश नागरिक आहेत. भारतात प्रशिक्षित 40 हजार परिचारिकाही ब्रिटनच्या आरोग्य सेवेत आहेत. दररोज नियमानुसार 8 तास कामकाजाची वेळ असताना भारतीय डॉक्टर व परिचारिका दररोज 12 तासांवर जबाबदारी पार पाडत आहेत. मूळ भारतीयांपैकी बहुतांश डॉक्टर संपात सहभागी झालेले नाहीत. ब्रिटनमधील लहान गावे, तसेच दुर्गम भागात ब्रिटिश डॉक्टर काम करत नाहीत. भारतीय डॉक्टर तेथेही कर्तव्य बजावतात. याउपर भारतीय डॉक्टरांना भेदभावाचा सामना करावा लागत आहे. भारतीय डॉक्टरांविरुद्ध आलेल्या तक्रारीची दखल प्रशासनाकडून तातडीने घेतली जाते व कारवाईसाठी प्रशासन जणू टपून बसलेले असते, तक्रारीची वाटच बघत असते, असा अनुभव भारतीय डॉक्टर आता शेअर करू लागले आहेत.

डॉक्टरची सुसाईड नोट सार्वजनिक

गतवर्षी बर्मिंघम क्विन एलिझाबेथ रुग्णालयातील डॉ. वैष्णवी (वय 35) यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबाने नुकतीच त्यांची सुसाईड नोट सार्वजनिक केली असून, त्यात रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आले आहे. रुग्णालयातील वातावरणाने माझी कोंडी केली होती. मी त्यामुळे मोडून पडले, असे डॉ. वैष्णवी यांनी या नोटमध्ये म्हटले होते. वैष्णवी यांच्या पित्याने इतर डॉक्टरांनी बोध घ्यावा म्हणून ती सार्वजनिक केली आहे.

Back to top button