Aruna Miller | भारतीय वंशाच्या अरुणा मिलर यांनी रचला इतिहास, भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली मेरीलँडच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी शपथ | पुढारी

Aruna Miller | भारतीय वंशाच्या अरुणा मिलर यांनी रचला इतिहास, भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली मेरीलँडच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी शपथ

पुढारी ऑनलाईन डेस्क : हैदराबादमध्ये जन्मलेल्या मूळ भारतीय वंशाच्या अरुणा मिलर (Indian-American Aruna Miller) यांनी अमेरिकेतील राजकारणात इतिहास घडवला आहे. अमेरिकेच्या मेरीलँड राज्याच्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून त्या विराजमान झाल्या आहेत. मिलर यांनी बुधवारी मेरीलँडच्या १० व्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून शपथ घेतली. त्या मेरीलँडच्या पहिल्या भारतीय वंशाच्या गव्हर्नर बनल्या आहेत. नवनियुक्त लेफ्टनंट गव्हर्नरपदी मिलर यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली.

५८ वर्षीय मिलर यांनी वाहतूक अभियंता क्षेत्रात करिअर केले आहे. त्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या कुटुंबियांना दिले आहे. त्यांचे कुटुंब भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झाले आहे. त्यांचे वडील मेकॅनिकल अभियंता असून ते १९६० च्या उत्तरार्धात शिक्षणासाठी विद्यार्थी म्हणून पहिल्यांदा अमेरिकेत गेले होते आणि त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना अमेरिकेत नेले. तर वयाच्या ७ व्या वर्षी १९७२ मध्ये अरुणा मिलर अमेरिकेत गेल्या होत्या.

वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, न्यूयॉर्कमधील अपस्टेट येथे त्यांचे पालक आणि दोन भावंडांचे घर आहे. त्यांचे वडील IBM मध्ये अभियंता होते. अरुणा मिलर यांनी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत विजय मिळवला होता. मिलर यांनी २०१० ते २०१८ या कालावधीत मेरीलँड हाऊस ऑफ डेलिगेट्समध्ये दोन वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी अमेरिकन काँग्रेससाठी निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता.

भारत ते अमेरिका- जीवन प्रवास केला कथन

लेफ्टनंट गव्हर्नरपदाच्या शपथविधी कार्यक्रमात त्यांनी भारत ते अमेरिका असा जीवन प्रवास कथन केला. यावेळी त्या भावूक झाल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या शाळेतील पहिल्या दिवसाच्या अविस्मरणीय क्षणाची आठवण सांगितली. “कोणीही माझ्यासारखे दिसत नव्हते आणि मला इंग्रजीचा एक शब्दही बोलता येत नव्हता. पण मला त्यात स्वतःला सामावून घ्यायचे होते. म्हणून जेव्हा आम्ही कॅफेटेरियात गेलो तेव्हा माझ्याकडे एक योजना होती. बाकीचे सगळे काय करत आहेत तेच मी करत होते.” असे मिलर यांनी सांगितले.

‘भारतात माझ्या आजीकडे परत जायचे होते’

“म्हणून मी पहिल्यांदाच अमेरिकन अन्नपदार्थ खाल्ले. मी माझ्या जीवनात पहिल्यांदाच कोल्ड मिल्क प्यायले. मला खूप छान वाटले. मला वाटले ठीक आहे, मला वाटले की ते आता माझे मित्र झालेत. मी परत वर्गात गेले. पण डेस्कवर उलट्या केल्या. मला खूप वाईट वाटले. माझ्या शिक्षिकेने माझ्या आईला बोलावले. त्यानंतर मी तिला सांगितले की भारतात मला माझ्या आजीकडे परत जायचे आहे जिणे मला वाढवले.” असे मिलर म्हणाल्या.

भारतीय- अमेरिकनमध्ये लोकप्रिय व्यक्ती

गव्हर्नरपदी शपथ घेतल्यानंतर मिलर यांनी आई-वडील आणि त्यांच्या भावंडांचेही आभार मानले. मिलर (Aruna Miller) ह्या मेरीलँड राज्यातील भारतीय- अमेरिकन लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. तसेच त्यांना अनेक रिपब्लिकन, ट्रम्प समर्थकांनी पाठिंबा दर्शवला आहे. मिलर यांनी मेरीलँडच्या मॉन्टगोमेरी काउंटी येथील स्थानिक वाहतूक विभागामध्ये सार्वजनिक सुरक्षेसाठी २५ वर्षे काम केले आहे. त्यांना २००० मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान केले. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

हे ही वाचा :

Back to top button