औरंगाबादेत उभारणार 12 हजार कोटींचा 'रिन्युएबल एनर्जी' प्रकल्प : मुख्यमंत्री शिंदे

दाओस, वृत्तसंस्था : जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्याच दिवशी ८८ हजार ४२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून, त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन औद्योगिक वसाहतीत १२ हजार कोटींची गुंतवणूक असलेला ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा करार ग्रीनको रिन्युएबल एनर्जी कंपनीसोबत झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
परिषदेत पहिल्याच दिवशी ४५ हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकींचे सामंजस्य करार झाल्यामुळे, महाराष्ट्रावर उद्योग व गुंतवणूकदारांचा विश्वास सिद्ध झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी त्यात भर पडून एकूण ८८ हजर कोटींचे करार झाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुसज्ज अशा महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटनही करण्यात आले. या पॅव्हेलियनला भेट देऊन महाराष्ट्राविषयी जाणून घेण्यासाठी अनेक उद्योगांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली. औरंगाबाद येथे ग्रीनको नविनीकरण ऊर्जा (रिन्युएबल एनर्जी) प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे ६ हजार ३०० जणांना रोजगार मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.