इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानकडे एका हातात अण्वस्त्रे आहेत आणि दुसर्या हातात भिकेचा कटोरा आहे, यासारखे लज्जास्पद काही नाही. जगातील नेत्यांसमोर कर्जासाठी याचना करताना वाईट वाटते, असे उद्गार पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी काढले. देशाच्या कंगाल अवस्थेला त्यांनी इम्रान खान यांच्या पक्षाला थेट जबाबदार धरले.
पाकिस्तानी प्रशासकीय सेवेतील नवीन अधिकार्यांच्या तुकडीसमोर भाषण करताना शरीफ यांनी आपली खंत बोलून दाखवली. ते म्हणाले की, देशाची कंगाल अवस्था व्हायला तहरीक ए पाकिस्तान हा पक्षच कारणीभूत आहे. आंदोलने आणि सार्वत्रिक गोंधळात त्यांनी देशाचा वेळ वाया घालवला. आज जगातील नेत्यांसमोर कर्जासाठी याचना करताना अत्यंत क्लेष होतो. त्यांच्याकडून पैसे घेतले तरी कधी ना कधी ते परत करावेच लागणार आहेत. त्यामुळे अशी याचना करताना लाज वाटते. आपल्याकडे अण्वस्त्रे आहेत अशा फुशारक्या आपण मारतो, पण प्रत्यक्षात स्थिती अशी आहे की आपल्या एका हातात अण्वस्त्रे आहेत आणि दुसर्या हातात भिकेचा कटोरा, यासारखे लज्जास्पद दुसरे काही नाही. संयुक्त अरब अमिरातीने 1 अब्ज कर्ज देण्याला मंजुरी दिली आहे तर सौदीचे राजे आर्थिक मदत करायला तयार आहेत, असेही ते म्हणाले.
इम्रान खान यांनी भारताचे कौतुक करीत शरीफ यांना निशाण्यावर घेतले आहे. 2000 साली भारताची आयटी क्षेत्रातील निर्यात 1 अब्ज डॉलर्सची होती. आज हा आकडा 140 कोटी डॉलर्सपर्यंत गेला आहे आणि पाकिस्तानचे नेते आज जगात दारोदार भीक मागत हिंडत आहेत. शरीफ आणि झरदारी या दोन कुटुंबांनी 35 वर्षांत पाकिस्तानचे वाटोळे केले, असेही ते म्हणाले. पंतप्रधान शरीफ म्हणाले की, प्रारंभापासूनच सारे चुकत गेले आहे. गेल्या 75 वर्षांत जे जे सत्तेत होते, मग ते लष्करी शासक असतील की लोकनियुक्त या सर्वांनीच देशाला आणि जनतेला भेडसावणार्या प्रश्नांची सोडवणूक कधीच केली नाही.