चिनी पर्यटकांमुळे थायलंडसमोर कोरोनाचे संकट | पुढारी

चिनी पर्यटकांमुळे थायलंडसमोर कोरोनाचे संकट

बिजींग; वृत्तसंस्था :  चीनच्या दबावापोटी कोरोना निर्बंध शिथील केल्यानंतर थायलंडमध्ये हजारो चिनी पर्यटक दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. यांची कोणतीही चाचणी होत नसल्याने कोरोनाबाधितांचा लोंढा थायलंडसमोर नवीन संकट उभे करण्याची शक्यता आहे.
पर्यटनावर पूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या थायलंडचे कोरोना काळात कंबरडे मोडले होते. चीनच्या पर्यटकांचा थायलंडमध्ये येणार्‍या पर्यटकांत मोठा वाटा असतो. पण निर्बंधांमुळे ही संख्या रोडावली होती. सध्या चीनमध्ये कोरोनाची साथ भयावह रुप घेत असतानाच आता चीनच्या दबावामुळे थायलंडमध्ये विदेशातून येणार्‍या प्रवाशांवरील निर्बंध हटवण्यात आल्याने चिनी पर्यटकाचा लोंढा वाढत आहे. हे पर्यटक कोरोनाबाधित आहेत की नाही याची शहानिशा करण्याची कोणतीही उपायययोजना नसल्याने थायलंडमध्ये आगामी काळात आरोग्य संकट उभे राहाते की काय अशी शंका व्यक्त होत आहे.

जैविक युद्धाची शक्यता ?

कोरोनाचे संकट जगावर आदळण्याआधीपासून चीन जैविक अस्त्रे विकसित करत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट अमेरिकी गुप्तचर विभागाने केला आहे. दोन वर्षांच्या सखोल अभ्यासानंतर सादर करण्यात आलेल्या या अहवालात म्हटले आहे की, चीनने सार्स, कोरोनाव्हायरसवर विशेष संशोधन करत असल्याचे मान्य केले होते.

स्फोटक अहवाल

अमेरिकी संसदेच्या गुप्तचर विभागविषयक समितीने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, 2005 ने अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने जाहीरपणे सांगितले होते की, चीन जैविक अस्त्रे विकसित करत आहे. या कामी चीनच्या दोन प्रयोगशाळा संशोधन करत आहेत. 2006 साली चीनने जैविक व रासायनिक अस्त्र विषयक परिषदेत त्यांची फिफ्थ इन्स्टीट्यूट ही संस्था सार्स कोरोनाव्हायरसवर संशोधन करत असल्याचे मान्य केले होते. या शिवाय 2015 मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनपर पुस्तकात चीन कृत्रिम व्हायरस तयार करून तो मानवांमध्ये पसरवण्याबाबत संशोधन करत असल्याचे म्हटले होते.

Back to top button