कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण कठीण, दुष्काळाचा ९० टक्के जगाला फटका; 'ऑक्सफर्ड' चा निष्कर्ष

लंडन, वृत्तसंस्था : जगभरातील ९० टक्के लोकांना वाढती उष्णता आणि दुष्काळाचा फटका नजिकच्या भविष्यात बसणार आहे, असा निष्कर्ष ‘ऑक्सफर्ड स्कूल ऑफ जिओग्राफी’च्या अभ्यासातून पुढे आला आहे. जगभरातील कार्बन उत्सर्जनावर कोणताही अंकुश नसल्यामुळे सामाजिक विषमता वाढत जाण्याचा धोका असल्याचेही या अभ्यासातून लक्षात आले आहे.
सरत्या वर्षात जगाचे तापमान विक्रमी वेगाने वाढत चालले आहे. ही उष्णता आणि तिचा परिणाम म्हणून जागोजागी पडत असलेला दुष्काळ यामुळे समाजावर भयंकर परिणाम होत असून, थेट आर्थिक परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली आहे. वुहान युनिव्हर्सिटीचे संशोधक डॉ. जिआबो यिन आणि ऑक्सफर्डचे प्रोफेसर लुई स्लेटर यांनी या अभ्यासात म्हटले आहे. ग्रामीण आणि गरीब जनसमुदायांवर या परिस्थितीचा विपरीत परिणाम होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
जगभरात या वातावरणाचा दहापट परिणाम होणार असून, जलसाठे घटत जाणार आहेत. सर्व देशांच्या जीडीपीलाही त्याचा फटका बसणार आहे. डॉ. यिन म्हणतात, या अभ्यासासाठी आम्ही देशोदेशी वाढत चाललेल्या तापमानाचा आणि घटत चाललेल्या जलपातळीचा अभ्यास केला. कमीत कमी कार्बन उत्सर्जन केले, तरी या परिणामांमधून जगाची सुटका होऊ शकणार नाही. याचा एकत्रित परिणाम प्रत्येक देशाच्या अवस्थेवर झाल्याशिवाय राहणार नाही.
कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण कठीण
प्रो. स्लेटर यांच्या मते जगभराच्या वाढत चाललेल्या तापमानाचा सर्वंकष विचार करावा लागणार आहे. या परिस्थितीत संयुक्त राष्ट्र संघाचे शाश्वत विकास उद्दिष्ट (एसडीजी) गाठण्याचे आव्हान जगापुढे आहे. त्यासाठी पाणी आणि ऊर्जेच्या उपलब्धतेचा, तसेच वापराचा विचार करावा लागणार आहे. मर्यादित पाण्यामुळे कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवून ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणे अवघड आहे.