विमानात आले दोन हार्ट अॅटॅक; भारतीय डॉक्टरने वाचवले प्राण | पुढारी

विमानात आले दोन हार्ट अॅटॅक; भारतीय डॉक्टरने वाचवले प्राण

लंडन; वृत्तसंस्था : ब्रिटनमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या एका भारतीय डॉक्टरने विमानात पाठोपाठ दोनदा हृदयविकाराचा झटका आलेल्या एका रुग्णाचे पाच तास भगीरथ प्रयत्न करून प्राण वाचवले. या प्रवाशासाठी विमान मुंबईत उतरवण्यात आल्यावर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तो आता ठीक झाला आहे.

डॉ. विश्वराज वेमुला असे या डॉक्टरचे नाव असून, ते बर्मिंगहॅमच्या रुग्णालयात हेपॅटोलॉजिस्ट म्हणून सेवा बजावतात. ते लंडनहून भारतात आपल्या घरी बंगळूरला जाण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात एअर इंडियाच्या विमानात बसले. विमान हवेत असतानाच एका प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागले आणि तो आसनावरून उठताच खाली कोसळला. विमान कर्मचाऱ्यांनी त्याला मदत करतानाच डॉक्टर •असलेल्या प्रवाशांबद्दल विचारणा केली असता, डॉ. वेमुला तेथे आले व त्यांनी उपचाराला सुरुवात केली. विमानातील प्रथमोपचार पेटीत त्यांना सुदैवाने प्राथमिक उपचाराची साधने मिळाली. त्यांच्याच मदतीने व काही प्रवासी व कर्मचारी यांच्या मदतीने त्यांनी त्या प्रवाशावर उपचार केले. एकापाठोपाठ एक असे दोन हृदयविकाराचे झटके आल्याने या रुग्णाचा रक्तदाब आटोक्यात येत नव्हता; तर नाडीही हाती लागत नव्हती. त्याला बेशुद्ध होऊ न देणे यासाठी हाती लागेल त्या साधनांनी डॉ. वेमुला यांनी प्रयत्न केले. पाच तास हे सगळे नाट्य सरू होते. पायलटनेही आपत्कालीन लैंडिंगसाठी मुंबईला विमान उतरवण्याची परवानगी मिळवली. विमान उतरताच या प्रवाशाला तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने ताब्यात घेतले व रुग्णालयात हलवले. जाताना त्या प्रवाशाने अश्रूंना वाट करून दिली. या घटनेबद्दल डॉ. वेमुला यांच्या रुग्णालयाने अधिकृत निवेदन जारी करत त्यांचे कौतुक करीत आभार मानले आहेत.

Back to top button