पाकिस्तानात हिंदू महिलेची हत्या | पुढारी

पाकिस्तानात हिंदू महिलेची हत्या

कराची, वृत्तसंस्था : पाकिस्तानात हिंदू महिलांवर होणार्‍या अत्याचारात वाढ होत असून पुन्हा एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका 40 वर्षीय हिंदू महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या दुर्दैवी महिलेचे नाव दया भेल असे आहे. दरम्यान, या संतापजनक घटनेवर भारताने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.

पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या हक्क आणि अधिकारांचे रक्षण करणे हे तेथील सरकारचे मुख्य कर्तव्य असून भविष्यात अशा घटना होता कामा नयेत, अशा शब्दांत भारताने पाकिस्तान सरकारला बजावले आहे.

क्रौर्याचा कळस

सिंझोरो शहरात एका हिंदू महिलेचा मृतदेह आढळला. आरोपींनी महिलेच्या शरीरावरील कातडीही सोलली आणि शिरच्छेद केला. महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. या महिलेला चार मुले आहेत. पतीच्या मृत्यूनंतर ती आपल्या मुलांचे संगोपन करत होती. बुधवारी शेतात कुजलेल्या स्थितीत या महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला. पाकिस्तानमधील पहिल्या महिला हिंदू खासदार कृष्णा कुमारी यांनी या भयावह घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे.

हिंदू मुलीचीही हत्या

पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधील सिक्कूर जिल्ह्यात सोमवारी एका हिंदू मुलीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या अठरा वर्षीय मुलीने अपहरणाला विरोध केला होता. नंतर अपहरणकर्त्यांनी तिच्या डोक्यात गोळी झाडली. पूजा कुमारी ओडे असे या मुलीचे नाव असून जबरदस्तीने धर्मांतर व अपहरणाला विरोध केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली.

Back to top button