Russia Ukrain War : रशियात युक्रेनच्या ड्रोनचा विमानतळावर हल्ला | पुढारी

Russia Ukrain War : रशियात युक्रेनच्या ड्रोनचा विमानतळावर हल्ला

मॉस्को; वृत्तसंस्था :  दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात सलग दुसर्‍यांदा युक्रेनने रशियात घुसून हल्ला चढवला आहे. शेकडो किलोमीटर आत घुसत युक्रेनच्या लढाऊ ड्रोनने रशियन हवाईदलाच्या इगल्स या हवाईतळावर हल्ला चढवला. यात तीन रशियन सैनिक मरण पावले. रशियाने हे ड्रोन पाडले असले, तरी इतक्या आतपर्यंत घुसून युक्रेनने हल्ला केल्याने ही रशियाची नाचक्की समजली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने पाठवलेल्या या लढाऊ ड्रोनची क्षमता 600 मैल एवढी आहे. हे ड्रोन रशियाची हवाई सुरक्षा भेदून आत प्रवास करत मॉस्कोपासून 700 कि.मी. अंतरावर असलेल्या इगल्स या रशियन हवाई दलाच्या हवाईतळावर आले. तेथे या ड्रोनने काही स्फोटकेही टाकली. त्याच्या स्फोटात रशियाचे एक टीयू 95 बॉम्बर विमान क्षतीग्रस्त झाले. तिघेजण ठार झाले व सातजण जखमी झाले. रशियाने या हल्ल्याला पुष्टी दिली असली, तरी युक्रेनने मात्र त्याची जबाबदार स्वीकारलेली नाही; पण ‘पेराल तसे उगवते’ असे सूचक विधान करीत युक्रेनच्या लष्कराने यावर अधिक भाष्य टाळले आहे. मागील महिन्यात युक्रेन सीमेनजीकच्या एका हवाईतळावरही युक्रेनने हल्ला चढवला होता; पण यावेळचा हल्ला हा थेट रशियात घुसून केलेला असल्याने हवाई सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

Back to top button