तवांग हा ट्रेलर; चीन पुन्हा हल्ले करणार : तज्ज्ञांचे मत | पुढारी

तवांग हा ट्रेलर; चीन पुन्हा हल्ले करणार : तज्ज्ञांचे मत

बीजिंग; वृत्तसंस्था :  राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या तिसर्‍या कार्यकाळावर शिक्कामोर्तब करण्यासाठी झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनाची सुरुवातच गलवान खोर्‍यातील भारत-चीन चकमकीची द़ृश्ये मोठ्या पडद्यावर दाखवून झाली होती. पुढे जिनपिंग यांचे भारताबाबतचे धोरण काय असेल, त्याची ही झलक होती आणि तवांगमधील चकमकीने प्रचितीही आली; पण हा विषय एवढ्यावर संपणारा नाही. अध्यक्ष माओ यांचे स्वप्न चीनमध्ये जोवर जिवंत राहील, तोवर चीन हा भारतासाठी सर्वात मोठा धोका म्हणून कायम राहील, असे आंतरराष्ट्रीय सामरिकतज्ज्ञांतून बोलले जात आहे.

16 ऑक्टोबर रोजी 2,300 सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनात गलवान खोर्‍यातील भारताविरुद्धच्या धुमश्चक्रीला कारणीभूत ठरलेल्या कमांडर कुई फाबाओ याला विशेष पाहुणा म्हणून बोलावण्यात आलेले होते. कम्युनिस्ट क्रांतीच्या नावावर समोर आलेला हा पक्ष 1948 पासून चीनमध्ये सत्तेवर आहे. जिनपिंग यांनी फाबाओला विशेष निमंत्रण का दिले होते, त्याचे उत्तर 9 डिसेंबर रोजी तवांगमध्ये झालेल्या भारत-चीन चकमकीतून मिळाले आहे. तवांगमधून चिनी सैनिकांना हुसकावून लावण्यात, त्यांची हाडे मोडण्यात भारतीय जवानांना यश आलेले असले; तरी चिनी सैनिकांची भारतीय चौकी ताब्यात घेण्यासाठीची ही आगळीक हा चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या धोरणाचा एक भाग आहे. येत्या 2027 पर्यंत जिनपिंग यांच्या या लहानसहान चाली निर्णायक युद्धाचे रूप घेऊ शकतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

तळहात, अन्य 5 बोटे कोणती?

चीनचे नेते अध्यक्ष माओ त्से तुंग यांनी 1949 मध्ये, लडाख, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, भूतान आणि नेपाळ या 5 बोटांसह तिबेट नावाचा पंजा जोवर चीनमध्ये समाविष्ट होत नाही, तोवर चीन थांबणार नाही, असे मत व्यक्त केले होते. दोन वर्षांनी 1951 मध्ये चीनने तिबेटवर ताबा मिळविला. याचाच अर्थ असा की, चीनने माओंच्या महत्त्वाकांक्षेतील तळहात गिळंकृत केलेला आहे. आता बोटे गिळण्याच्या पहिल्या टप्प्यात जिनपिंग यांचा लडाख, सिक्कीम व अरुणाचलवर डोळा आहे.

   निष्कर्षामागे तज्ज्ञांचे तर्क

  • चीनमध्ये जिनपिंग यांना असलेला विरोध मावळायचा, तर भारताविरुद्ध युद्ध एक चांगला पर्याय ठरू शकतो, असाही जिनपिंग यांचा होरा आहे.
  • तैवान, दक्षिण चीन समुद्र आणि भारत हे तीन टार्गेट चीनसमोर सध्या आहेत. तैवान व दक्षिण चीन समुद्रात कुठलीही कारवाई केली; तर चीनला एकाचवेळी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियाशी युद्ध करावे लागेल.
  •  दुसरीकडे भारताला चीन एकाकी मानतो. भारतावर हल्ला केल्यास अमेरिकेसह पाश्चात्त्य देशांतून भारतासाठी मदत यायला एक वेळ जावा लागेल, असे चीनला वाटते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडेन पटकन निर्णय घेणार नाहीत, असे जिनपिंग यांना वाटते.

Back to top button