इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलकांविरुद्ध सरकारी हिंसाचार; आजवर ६० मुलांचा मृत्यू | पुढारी

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलकांविरुद्ध सरकारी हिंसाचार; आजवर ६० मुलांचा मृत्यू

तेहरान; वृत्तसंस्था :  इराणमध्ये हिजाब- बुरख्याविरोधातील निदर्शनांत आतापर्यंत ६० हून अधिक बालकांचा बळी गेला आहे. या मुलांचे वय १८ वर्षांहून कमी होते. मृतांमध्ये १२ अल्पवयीन मुली व ४६ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. देशातील एका मानवाधिकार संघटनेच्या माहितीनुसार आतापर्यंत पोलिसांनी २०० अल्पवयीनांना अटक केली आहे.

एका खुनाच्या प्रकरणात इराणने ३ अल्पवयीनांना आरोपी घोषित केले आहे. या तिघांसह इतरांवर तेहरानमधील एका पोलिस अधिकाऱ्याला ठार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. इराणमध्ये अशा गुन्ह्यात मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. विशेष म्हणजे हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरणे हाताळणाऱ्या कोर्टात चालवले जात आहे. तिन्ही अल्पवयींनांविरोदात तेहरानच्या कराजमध्ये सुनावणी झाली.

१५ वर्षांत ७३ अल्पवयीनांना मृत्युदंड

  • इराणने अल्पवयीनांना मृत्युदंडाची शिक्षा न देण्याच्या संयुक्त राष्ट्राच्या एका करारावर स्वाक्षरी केली आहे, याउपरही या देशाचा अल्पवयीनांना शिक्षा देण्यात पहिला क्रमांक आहे. इराणमध्ये ९ वर्षांवरील मुलींना मृत्युदंड देता येऊ शकतो. मुलांसाठी हे वय १५ वर्षांचे आहे.
  • २००५ ते २०१५ दरम्यान इराणमध्ये ७३ मुलांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या अल्पवयीनांना प्रत्यक्ष फाशीपूर्वी ७ वर्षे कारावास भोगावा लागतो. काही प्रकरणांत ही शिक्षा १० वर्षांचीही असते. आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार १८ वर्षांखालील आरोपींना फाशीची शिक्षा देता येत नाही.

Back to top button