चिनी सीमेलगत भारत-अमेरिकेचा युद्ध सराव | पुढारी

चिनी सीमेलगत भारत-अमेरिकेचा युद्ध सराव

डेहराडून, वृत्तसंस्था : उत्तराखंडमधील औलीलगत चीन सीमेजवळ भारत आणि अमेरिकेचे जवान धडकले आहेत. रशियाच्या ‘एमआय-17 व्ही-5’ या हेलिकॉप्टरमधून भारतीय तसेच अमेरिकन जवान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उतरले. दोन्ही देशांचा संयुक्त युद्ध सराव 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेला आहे आणि तो 2 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून औली गाव अवघे 100 किलोमीटर अंतरावर आहे. दोन्ही देशांतील जवान पर्वतीय आणि अत्यंत कडाक्याची थंडी असलेल्या भागात नियमितपणे एकत्रित युद्ध सराव करतात. गतवर्षी अमेरिकेतील अलास्का पर्वतीय भागात दोन्ही देशांचा संयुक्त युद्ध सराव पार पडला होता. औली येथील लष्करी सरावादरम्यान भारतीय जवानांनी दहशतवादविरोधी कारवाईत कुत्र्यांच्या वापराचे सफाईदार प्रात्यक्षिक केले. अमेरिकन जवानांनीही त्याचे कौतुक केले.

उत्तराखंडला लागून असलेली चीनची सीमा भारतीय लष्कराच्या सेंट्रल कमांडअंतर्गत येते. या भागाच्या मालकीवरून भारत आणि चीनमध्ये बर्‍याच काळापासून वाद आहे. दोन वर्षांपूर्वी गलवान खोर्‍यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर या भागात चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. भारत आणि अमेरिकेचा या भागातील लष्करी सराव त्यामुळेच लष्करी द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे. युद्ध सराव सुरू झाल्यापासून या भागातील चीनच्या हालचाली नुसत्याच मंदावलेल्या नाहीत; तर थंडवलेल्या आहेत, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

भारत आणिऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांचे सैन्य 28 नोव्हेंबर ते 11 डिसेंबरदरम्यान पहिला संयुक्त लष्करी सराव करत आहेत. दोन्ही देशांच्या पायदळ तुकड्या या सरावात सहभागी झाल्या आहेत.

Back to top button