गोवा महोत्सवासाठी बुरखाविरोधक निर्मात्याला इराणने परवानगी नाकारली | पुढारी

गोवा महोत्सवासाठी बुरखाविरोधक निर्मात्याला इराणने परवानगी नाकारली

तेहरान, वृत्तसंस्था :  इराण सरकारने आपल्याच देशातील एका गुणी चित्रपट निर्मात्याला भारतात जाण्याची परवानगी दिली नाही. ‘व्हरायटी मॅगझिन’ने दिलेल्या माहितीनुसार, इराणी चित्रपट निर्माते रझा दोर्मेशियान हे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गोव्यात येणार होते. त्यांच्या ‘अ मायनर’ या चित्रपटाची स्क्रीनिंग या महोत्सवात आयोजित होती. मात्र, रझा यांनी हिजाब – बुरखाविरोधी आंदोलकांना पाठिंबा दिलेला असल्याने या एका ‘गुन्ह्याची शिक्षा म्हणून त्यांना भारतात यायला परवानगी मिळाली नाही.

इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांनी निदर्शकांच्या हत्यांना आणि इराणच्या कथित मॉरल पोलिसिंगला विरोध केला होता. हिजाब – बुरखाविरोधी आंदोलक महिलांना पाठिंबा दिल्याने मला भारतात येण्यापासून रोखण्यात आले, असे स्वतः रझा यांनीही स्पष्ट केले आहे.

स्वतः खोमैनी यांच्या बहिणीची कन्या फरीदेह मोरादखानी यांनाही इराण सरकारविरोधात सर्व देशांनी इराणसोबतचे संबंध तोडण्याचे आवाहन केल्याने त्यांनाही तुरुंगात टाकण्यात आले आहे. हिजाबविरोधी आंदोलकांना पाठिंबा दिल्याबद्दल इराणचे प्रसिद्ध रॅपर तूमाज सालेही यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. सालेही यांना फाशीची शिक्षाही होऊ शकते. हिजाबविरोधातील निदर्शनांदरम्यान आतापर्यंत ४५० जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल १८ हजार १७३ लोकांना अटक करण्यात आली आहे.

Back to top button