Latest
भारतद्वेष्ट्या पाकिस्तानात अशी केली जाते लष्करप्रमुखाची निवड
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भारतद्वेष्ट्या पाकिस्तानमध्ये नव्या लष्करप्रमुखांची निवड करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. 1972 पर्यंत कमांडर इन चीफ ऑफ द पाकिस्तान आर्मी या नावाने लष्करप्रमुख हे पद ओळखले जात होते. त्यानंतर या पदाचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ असे नामकरण करण्यात आले. या पदावरील अधिकार्यांना फोर स्टारचा दर्जा देण्यात आला आहे.
भारतविरोध नसानसात…
असीम मुनीर हे पाकिस्तानचे अकरावे चीफ ऑफ आर्मी स्टाफ असणार आहेत. टिक्का खान यांच्यासह झिया ऊल हक, मिर्झा अस्लम बेग, आसिफ नवाझ, अब्दुल वहीद काकर, जहांगिर करामात, परवेझ मुशर्रफ, अश्फाक कयानी, राहील शरीफ आणि कमार जावेद बाजवा हे सर्व लष्करप्रमुख कमालीचे भारतविरोधी म्हणून ओळखले जातात.
- पाकिस्तानी राज्य घटनेच्या कलम 243 (3) नुसार पंतप्रधानांच्या शिफारशीनंतर राष्ट्राध्यक्ष लष्करप्रमुखांची नियुक्ती करतात.
- कलम व्हीएमध्ये नमूद केलेल्या बाबी पंतप्रधानांकडे मंजुरीसाठी पाठवल्या जातात. लेफ्टनंट कर्नल आणि त्याहून अधिक दर्जाच्या अधिकार्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या शिफारशीनुसारच संरक्षण सेवांमध्ये केली जाते.
- त्यानंतरच्या प्रक्रियेचा स्पष्ट उल्लेख राज्य घटनेत नाही. त्यामध्ये एवढेच लिहिले आहे की, ज्याच्यावर लष्करप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे त्याने यापूर्वी लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व केलेले असावे.
- लष्कराच्या मुख्यालयाकडून लेफ्टनंट जनरल हुद्द्यावरील चार ते पाच सर्वात ज्येष्ठ अधिकार्यांच्या गोपनीय फाईल्स संरक्षण मंत्रालयाकडे पाठवल्या जातात. नंतर त्या पंतप्रधानांच्या कार्यालयाला सुपूर्द करण्यात येतात. या नावांमधून पंतप्रधान आपल्या पसंतीच्या अधिकार्याची निवड करतात.
- संरक्षण मंत्रालय या अधिकार्यांची माहिती तपासू शकते. तथापि, सहसा असे होत नाही. नंतर पंतप्रधानांच्या कार्यालयात किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा केली जाते.
- ही चर्चा पार पडल्यानंतर मावळत्या लष्करप्रमुखांशी पंतप्रधान विचारविनिमय करतात व त्यानंतर अंतिम निवड केली जाते.

