‘मायक्रोसॉफ्ट’ सोडून ‘मेटा’त गेली, दोनच दिवसांत नोकरी गेली; भारतीय कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट | पुढारी

'मायक्रोसॉफ्ट' सोडून 'मेटा'त गेली, दोनच दिवसांत नोकरी गेली; भारतीय कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट

व्हँकुव्हर : वृत्तसंस्था : हैदराबादमधील ‘मायक्रोसॉफ्ट’ मधील नोकरीचा राजीनामा दिल्यावर कॅनडात ‘मेटा’मध्ये कामावर रुजू झालेल्या भारतीय तरुणीला अवघ्या दोनच दिवसांत तीही नोकरी गमवावी लागली. ‘मेटाने काढलेल्या ११ हजार जणांच्या यादीत तिचे नाव असून, तिची अवस्था बिकट बनली आहे.

मार्क झुकेरबर्ग यांनी ‘मेटा’ कंपनीत कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला. एकूण कर्मचारी संख्येच्या १३ टक्के म्हणजे साधारणतः ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची घोषणा केली. हे करताना देशनिहाय तपशील दिलेला नाही. कपातीच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी सुरू झाली आहे. अशाच एका नोकरी गमावलेल्या भारतीय तरुणीची कहाणी आता समोर आली आहे.

नीलिमा अग्रवाल असे तिचे नाव असून, तिने सोशल मीडियावर आपली आपबिती मांडली आहे. नीलिमा हैदराबाद येथे ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीत नोकरीला होती. तिथे दोन वर्षे काम केले. मोठ्या संधीच्या शोधात असलेल्या नीलिमाची काही महिन्यांपूर्वी ‘मेटा’ कंपनीत निवड झाली व तिला कॅनडात पोस्टिंग मिळाली. व्हिसा वगैरे अनेक किचकट बाबी पूर्ण करण्यात जवळपास महिना गेला.

अखेर ते पूर्ण केल्यावर ती कॅनडात पोहोचली. आठवडाभरानंतर ‘मेटा’मध्ये ती रुजूही झाली; पण अवघ्या दोनच दिवसांत तिला कंपनीच्या कर्मचारी कपातीचा फटका बसला. ११ हजार जणांच्या यादीत तिचे नाव असल्याने तिला कार्यमुक्त करण्यात आले. तिला आता तिथे दोन महिन्यांत नवीन नोकरी शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत किंवा भारतात परत यावे लागणार आहे. आयुष्यातील अतिशय क्लेशकारक प्रसंग असल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. असाच प्रकार विश्वजित झावाच्या बाबतीतही घडला. बंगळूरला ‘अॅमेझॉन मध्ये तीन वर्षे काम केल्यानंतर ‘मेटा’ कंपनीत नोकरी लागली. अमेरिकेचे कठोर नियम व वेळ खाणारी प्रक्रिया यांचा मुकाबला करीत अमेरिकेत तो दाखल झाला. ‘मेटा’मध्ये रुजू झाला आणि त्यालाही तिसऱ्याच दिवशी नोकरी गमवावी लागली. ‘मेटा’च्या तांत्रिक चमूत कार्यरत राजू कदम यांच्याबाबतीतही असाच प्रकार घडला. अमेरिकेत १६ वर्षांपासून राहणाऱ्या कदम यांची नोकरी गेली. २००८, २०१५ आणि २०२० या तिन्ही मंदींच्या लाटेत त्यांची नोकरी टिकून राहिली; पण आता अचानक ही घटना घडली.

Back to top button