Elon Musk : एलॉन मस्क यांचा ट्विटर कर्मचार्‍यांना नवा आदेश, ‘आठवड्यात 80 तास काम करण्यास तयार राहा’ | पुढारी

Elon Musk : एलॉन मस्क यांचा ट्विटर कर्मचार्‍यांना नवा आदेश, 'आठवड्यात 80 तास काम करण्यास तयार राहा'

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे (Twitter) नवे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी गुरुवारी (10 नोव्हेंबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर दिवाळखोर होण्याची शक्यता व्यक्त केली. ट्विटरमध्ये सध्या राजीनामा सत्र सुरू झाले आहे. अनेक अधिका-यांनी नोकरीवर पाणी सोडले आहे. या पार्श्वभूमीवर ट्विटरचे नवे मालक मस्क यांनी कंपनीची दिवाळखोरी नाकारता येत नाही असे ट्विटरच्या कर्मचा-यांना ठणकावून सांगितले आहे.

मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर (Twitter) विकत घेतले. जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपनीची सूत्रे मस्क (Elon Musk) यांनी हाती घेतल्यापासून तेथील कर्मचाऱ्यांचे वाईट दिवस सुरू झाल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस ट्विटर कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. मस्क यांनी सध्या कार्यरत असणा-या ट्विटर कर्मचा-यांना एक ई मेल पाठवला आणि सर्वांनाच धक्का दिला. मस्क यांनी ट्विटर दिवाळखोर होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे आपली कंपनी फायदेशीर स्थितीत राहण्यासाठी आठवड्यातून 80 तास काम करावे लागेल असा धमकीवजा आदेश त्यांनी जारी केला आहे. याशिवाय कार्यालयातील मोफत भोजनासारख्या सुविधाही रद्द करण्यात येणार आहेत. तसेच कोरोनाच्या काळात घरून काम करण्याची सुविधाही तात्काळ रद्द करण्यात आली आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

एलॉन मस्क (Elon Musk) म्हणाले की, ‘जो कोणी ऑफिसला येणार नाही, त्याने राजीनामा दिला आहे असे मानले जाईल. जर कंपनी अधिक नफाखोरी जमा करू शकली नाही तर दिवाळखोरीचा धोका असू शकतो. या संकटाचा सामना करण्यासाठी, आपल्या 8 डॉलर सदस्यता शुल्क योजनेसह त्वरित पुढे जावे लागेल.’

दरम्यान, कर्मचार्‍यांकडून अधिकाधिक काम करून घेण्यासाठी त्यांना आर्थिक संकटाबाबत सांगण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यानंतर दोन महिन्यांत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांनी अर्ध्याहून अधिक कर्मचा-यांना कामावरून काढून टाकले आहे. भारतातही ट्विटर इंडियामधून 90 टक्के कर्मचारी कपात करण्यात आली आहे. यात ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांचाही समावेश आहे. तर इतर कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येऊन काम करण्याचे आदेश दिले आहेत.

ब्लूमबर्ग न्यूजनुसार, लोकांचा ट्विटरवरील विश्वास कमी झाला आहे. सुमारे 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर विकत घेतल्यानंतर दोन आठवड्यांनंतर, मस्क यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की ते ट्विटरच्या दिवाळखोरीची शक्यता नाकारू शकत नाहीत.

ट्विटरचे (Twitter) मालक बनताच मस्क (Elon Musk) यांनी पहिल्यांदा सीईओ पराग अग्रवाल, सीएफओ नेड सेगल आणि कायदेशीर व्यवहार-पॉलिसी हेड विजया गड्डे यांना काढून टाकले. त्यांची कंपनीच्या मुख्यालयातून हकालपट्टी करण्यात आले. यानंतर त्यांनी ‘द बर्ड इज फ्रीड’ (the bird is freed) म्हणजेच चिमणी मुक्त झाली असे ट्विट करून आनंद व्यक्त केला होता.

Back to top button