Shri Thanedar : मराठमोळे ‘श्रीनिवास ठाणेदार’ झाले पुन्हा एकदा अमेरिकेचे खासदार, मध्यावधी निवडणुकीत विजय | पुढारी

Shri Thanedar : मराठमोळे ‘श्रीनिवास ठाणेदार’ झाले पुन्हा एकदा अमेरिकेचे खासदार, मध्यावधी निवडणुकीत विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय-अमेरिकन उद्योजक श्रीनिवास ठाणेदार (Shri Thanedar) हे अमेरिकेच्या मिशिगन राज्यातून मध्यावधी निवडणुकीत विजयी झाले आहेत. ६७ वर्षीय ठाणेदार हे सध्या मिशिगन हाऊसमधील तिसऱ्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. ते मूळचे बेळगावचे आहेत. अनेक वर्षांपूर्वी ते अमेरिकेत स्थायिक झाले आहेत.

ठाणेदार (Shri Thanedar) यांना 84,096 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी बिविंग्स यांना 27,366 पेक्षा जास्त मते मिळाली. यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये निवडून आलेले ते चौथे भारतीय-अमेरिकन बनले आहेत. यात राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना आणि प्रमिला जयपाल यांचा समावेश आहे.

श्रीनिवास ठाणेदार (Shri Thanedar) यांचा जन्म शहापूरमधील मिरापूर गल्लीत झाला. सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करुन त्यांनी चिंतामणराव हायस्कूलमधून दहावी उत्तीर्ण केली. १९७७ मध्ये मुंबई विद्यापीठातून त्यांनी मास्टर्स डिग्री मिळवली. डॉ. ठाणेदार १९७९ मध्ये अमेरिकेत स्थलांतरित झाले. तिथे १९८२ मध्ये त्यांनी पॉलिमर केमिस्ट्रीत पीएचडी संपादन केली. १९८४ ते १९९० या कालावधीत त्यांनी सेंट लुईसमधील पेट्रोलाईट कॉर्पोरेशनमध्ये पॉलिमर सिंथेसिस केमिस्ट आणि प्रकल्पप्रमुख म्हणून काम पाहिले.

Back to top button