पुढारी ऑनलाईन: फोर्ब्सने नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या २० आशियाई महिला उद्योजकांच्या यादीत तीन भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत अशा महिलांचा समावेश आहे की, ज्यांनी कोविड-19 साथीच्या आजारामुळे जगात निर्माण झालेल्या अनिश्चिततेमध्ये आपला व्यवसाय वाढवण्यात उल्लेखनीय यश मिळवले.
या यादीमध्ये पुण्याच्या एमक्योर फार्माच्या कार्यकारी संचालक नमिता थापर, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या अध्यक्षा सोमा मंडल आणि होन्सा कंझ्युमरच्या सह-संस्थापक आणि चीफ इनोव्हेशन ऑफिसर गजल अलघ यांचा समावेश आहे. फोर्ब्सने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, या यादीतील काही महिला शिपिंग, रिअल इस्टेट आणि बांधकाम यासारख्या क्षेत्रात काम करत आहेत, तर काही तंत्रज्ञान, औषध आणि कमोडिटी यासारख्या क्षेत्रात प्रयोग करत आहेत.
नमिता थापर एक यशस्वी व्यावसायिक महिला आहेत. सध्या नमिता आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल कंपनी एमक्योरच्या कार्यकारी संचालिका आहेत. याशिवाय त्या इनक्रेडिबल व्हेंचर्स लिमिटेडच्या संस्थापक आणि सीईओ देखील आहेत.
नमिता थापर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. त्यांनी ग्रॅज्युएशन पुण्यातून केले. यानंतर नमिता यांनी ICAI मधून चार्टर्ड अकाउंटन्सीची पदवी घेतली. नमिता थापर आपले शिक्षण पूर्ण करून अमेरिकेत गेल्या. येथे त्यांनी ग्लॅक्सोस्मिथक्लाईन गाईडंट कॉर्पोरेशनमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. नमिता यांनी या महामंडळात वेगवेगळ्या पदांवर काम केले. काही वर्षांनंतर नमिता व्यापार जगताचा अनुभव घेऊन भारतात परतल्या. यानंतर त्यांनी येथे राहून व्यवसाय सुरू ठेवला.
नमिता थापरचे वैयक्तिक आयुष्य देखील एकदम परफेक्ट आहे. त्यांचा विवाह विकास थापर यांच्याशी झाला, जे एक हुशार उद्योगपती आहेत. नमिता आणि विकास यांना दोन मुले आहेत, त्यांची नावे वीर थापर आणि जय थापर आहेत. नमिता अनेकदा तिच्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या त्या शार्क टँक इंडिया' या रिअॅलिटी शोचा एक भाग आहेत.
नमिता थापर या करोडोंची मालकीण आहेत. त्याची नेटवर्थ लोकांना आश्चर्यचकित करण्यासाठी पुरेशी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नमिता थापरची एकूण संपत्ती 600 कोटी आहे.