

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix)ने आपल्या ग्राहकांसाठी नवी योजना आणली आहे. त्यांनी जाहिरात सबस्क्रिप्शनवाला बेसिक प्लॅन लॉन्च (Netflix ad-supported subscription plan) केला आहे. हा कंपनीचा सर्वात कमी किमतीचा ॲड-सपोर्टेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 720p किंवा HD व्हिडिओ पाहता येतील. यासाठी युजर्सना प्रत्येक महिन्याला 6.99 डॉलर (सुमारे 578 रुपये) मोजावे लागणार आहेत. मात्र, भारतात याची किंमत काय असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही.
'नेटफ्लिक्स बेसिक विथ अॅड्स' योजना यूएस सारख्या अनेक प्रदेशांमध्ये लाइव्ह झाली आहे. नवीन जाहिरात-समर्थित योजना भारतात देखील लाँच केली जाऊ शकते, मात्र कंपनीने अद्याप कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. नेटफ्लिक्स समोर ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिस्ने प्लस हॉटस्टार आणि इतर OTT प्लॅटफॉर्मच्या वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला नेटफ्लिक्स प्रेक्षकांमध्ये मोठी घट नोंदवली गेली. त्यामुळे नेटफ्लिक्सने प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नवीन परवडणारी योजना लाँच करून अधिकधिक सदस्यत्व मिळविण्याचा विचार केला आहे.
नेटफ्लिक्सने पुष्टी केली आहे की अॅड प्लॅनसह नवीन बेसिक जोडल्याने युजर्सच्या विद्यमान योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही. कंपनीचा आधीपासूनच एक बेसिक पॅक आहे, परंतु तो जाहिरातींशिवाय आहे आणि युजर्स कोणत्याही व्यत्ययाशिवाय सर्व कंटेंटचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय, प्रीमियम प्राईज टॅग सह त्यांचा स्टँडर्ड आणि प्रीमियम सब्सक्रिप्शन सुद्धा उपलब्ध आहे.
बेसिक आणि नवीन अॅड सबस्क्रिप्शनमध्ये काय फरक आहे? Netflix म्हणते की बहुतेक गोष्टी तशाच राहतात आणि युजर्सना प्रति तास (सरासरी) फक्त 4 ते 5 मिनिटे जाहिराती दिसतील. याशिवाय लोकांना कोणत्याही शो किंवा चित्रपटापूर्वी 15 किंवा 30 सेकंदांच्या जाहिराती दिसतील. Netflix च्या मते, नवीन प्लॅन टायटल डाउनलोड करण्याची क्षमता प्रदान करणार नाही. परवाना निर्बंधांमुळे सुरुवातीला मर्यादित चित्रपट/टीव्ही शो उपलब्ध होणार नाहीत.
कंपनीने पुष्टी केली आहे की सुरुवातीला फक्त काही देशांमध्ये नवा प्लॅन उपलब्ध असेल. यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, कोरिया, मेक्सिको, स्पेन, यूके आणि यूएस यांचा समावेश आहे. या यादीत भारताचा समावेश नाही. पण, Netflix च्या अधिकृत ब्लॉगमध्ये असे सांगण्यात आले आहे की कालांतराने ही योजना आणखी देशांमध्ये लॉन्च केली जाईल. त्यामुळे, भविष्यात भारतीयांना सुद्धा Netflix च्या ॲड सबस्क्रिप्शन बेसिक प्लॅनचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. येणा-या काळात कंपनी हा प्लॅन सध्याच्या प्लॅनपेक्षा कमी किंमतीत लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे. Netflix चे मोबाईल सबस्क्रिप्शन सध्या सर्वात स्वस्त आहे आणि त्याची किंमत 149 रुपये आहे.