

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) रोगजन्य बुरशीच्या संसर्गाची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. हे फंगल इन्फेक्शन्स वेगाने वाढत आहे. या यादीत अत्यंत धोकादायक अशा 19 बुरशीच्या प्रकारांचा समावेश आहे.
बुरशीजन्य संसर्गाच्या आरोग्यावर होणार्या परिणामांबद्दल अद्याप अभ्यास सुरू आहे. बुरशीजन्य संसर्ग आणि अँटिफंगल प्रतिरोधकांबद्दल माहिती मिळेपर्यंत सर्वांनी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांना आपल्या वैद्यकीय प्रयोगशाळा सक्षम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जागतिक आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार, बुरशीजन्य संसर्गावर अद्याप कोणतीही औषधे आराम देण्यासाठी सक्षम नाहीत. या वाढत्या संसर्गाचे निदानही त्वरित होत नाही व निदान झाल्यावरही यावर ठोस उपचार पद्धती उपलब्ध नाही. त्यामुळे वेळीच लक्ष न दिल्यास, स्वच्छता बाळगून आवश्यक काळजी न घेतल्यास बुरशीच्या संसर्गाचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
बुरशीजन्य संसर्ग गंभीरपणे आजारी असलेल्या व रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या रुग्णांवर परिणाम करू शकतात. याशिवाय, कर्करोग, एचआयव्ही/एडस्, अवयव प्रत्यारोपण, श्वसन रोग आणि प्राथमिक क्षयरोगाच्या संसर्गाने ग्रस्त असलेल्यांना बुरशीजन्य संसर्गाचा धोका जास्त असतो.