जिमी जिमी जिमी आ जा, आ जा, आ जा! शी जिनपिंग को ले जा, ले जा, ले जा!! | पुढारी

जिमी जिमी जिमी आ जा, आ जा, आ जा! शी जिनपिंग को ले जा, ले जा, ले जा!!

बीजिंग : वृत्तसंस्था : शांघाय या उद्योगनगरीसह चीनच्या 5 जिल्ह्यांमध्ये कोरोना लॉकडाऊन पूर्ववत लागू झालेला आहे. कामधंद्यांअभावी लोक वैतागले आहेत. शी जिनपिंग यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या तिसर्‍या कार्यकाळात कम्युनिस्ट सरकारविरोधातील आवाज अधिक तीव्रतेने दडपून टाकला जात असल्याने लोकांच्या अभिव्यक्तीला नवे धुमारे फुटले आहेत. ‘डिस्को डान्सर’ चित्रपटातील ‘जिमी जिमी जिमी आ जा, आ जा, आ जा’ या बप्पी लहिरी यांनी गायिलेल्या हिंदी गीताने सरकारविरोधातील चिनी जनतेच्या संतापाला वाट मोकळी करून दिलेली आहे.

चिनी लोक या गाण्याचे व्हिडीओ तयार करताना आपापली कल्पनाशक्ती लढवत आहेत. ‘जिमी जिमी आ जा’ या शब्दांचा हिंदीतील अर्थ प्रिय व्यक्तीला लडिवाळपणे आपल्याकडे बोलावणे असा असला, तरी चीनच्या मँडेरिन भाषेतील या शब्दांचा अर्थ अत्यंत वेगळा आहे.

चिनी अर्थ ‘आम्हाला भात द्या’

आम्हाला भूक लागलेली आहे, (हे या गाण्याच्या सुरुवातीला अध्यारुत धरले जाऊन) तेव्हा आम्हाला भात (तांदूळ) द्या,’ असा ‘जिमी जिमी आ जा,’ या शब्दांचा मँडेरिन भाषेतील अर्थ आहे. अनेक चिनी नागरिकांनी उर्वरित गाणे मँडेरिनमध्ये भाषांतरित केले आहे. अनेकांनी तेही तसेच हिंदीत ठेवलेले आहे.

‘जिमी जिमी’ जगात लोकप्रिय गाणे

संगीतकार, गायक बप्पी लहरी यांचे 1982 मधील हे गाणे तेव्हाही जगभरात गाजले होते. भारतातील जगभरात गाजलेल्या मोजक्या गाण्यांपैकी हे एक गाणे आहे. या गाण्याच्या जागतिक लोकप्रियतेचा लाभ अभिनेता मिथुन चक्रवर्तीलाही झाला होता. राज कपूरपाठोपाठ रशियात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला अभिनेता म्हणजे मिथुन… श्रेय अर्थातच ‘जिमी जिमी आ जा’ या गाण्यालाच जाते.

रिकामे ताट नाचवणार्‍या महिला

चिनी लोक विशेषत: महिला रिकामी ताटे-भांडी दाखवून ‘जिमी जिमी’वर व्हिडीओ आणि रिल्स बनवत आहेत. जिनपिंग यांनी ‘वन चायना-झीरो कोरोना’च्या हट्टापायी लादलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांकडे आता खायला उरलेले नाही. त्यामुळे सारे चिनी रिकाम्या ताटांसह ‘भात वाढा, भात वाढा’ (जिमी जिमी जिमी आ जा, आ जा, आ जा) असे आर्जव करत आहेत… यातून जिनपिंग राजवटीत झालेली चीनची दुर्दशा लोकांना अधोरेखित करायची आहे.

पाच जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन

शांघायमध्ये कोरोनाचे 47 रुग्ण आढळल्यानंतर शाळा-कॉलेज, इतर संस्था बंद करण्यात आल्या आहेत. शांघायसह आणखी 5 जिल्ह्यांत लॉकडाऊन लागू आहे.

रुग्णाला क्रेनने उचलून नेले

चीनमध्ये एका कोरोना रुग्णाला थेट क्रेनने उचलून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची अजब घटना घडलेली आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

Back to top button