Cyclone Sitrang | सितरंग चक्रीवादळाचा तडाखा; बांगलादेशात २८ जणांचा मृत्यू, १० हजार पत्र्याची घरे उद्ध्वस्त | पुढारी

Cyclone Sitrang | सितरंग चक्रीवादळाचा तडाखा; बांगलादेशात २८ जणांचा मृत्यू, १० हजार पत्र्याची घरे उद्ध्वस्त

ढाका : पुढारी ऑनलाईन; बांगलादेशात सितरंग चक्रीवादळाने (Cyclone Sitrang) मोठे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, बोट बुडून बेपत्ता झालेल्या बोटीवरील चारजणांचे मृतदेह बचावपथकाला मिळाले आहेत. वादळामुळे मोठी पडझड झाली असून वीज पुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे ५० लाख घरांतील वीज सेवा खंडित झाली आहे.

सितरंग चक्रीवादळ सोमवारी बांगलादेशातील दक्षिणेकडील भागात धडकले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लाखो लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. ताशी ८० किलोमीटर (५५ मैल) वेगाने वारे वाहून मोठे नुकसान झाले. सरकारकडून सांगण्यात आले आहे की सुमारे १० हजार पत्र्याची छप्पर असलेली घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मोठ्या प्रमाणावर पिके नष्ट झाली आहेत. (Cyclone Sitrang)
बंगालच्या उपसागरातील वादळात बुडालेल्या ड्रेजर बोटीच्या चार कर्मचाऱ्यांचे मृतदेह अग्निशमन विभागाच्या बचावपथकाला सापडले आहेत. दरम्यान, मुसळधार पावसामुळे ढाका, खुलना, बरिसाल येथे पूर आला आहे. या भागात सोमवारी ३२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ईशान्य भारतालाही तडाखा

चक्रीवादळाचा ईशान्य भारतातील विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्रतिकूल हवामानामुळे ईशान्य भारतातील किमान सात विमाने उड्डाणे रद्द करण्यात आली होती. शिलाँग आणि आयझॉलमधील विमानतळांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. शिलाँगला सिलचर, दिब्रुगा आणि कोलकाताशी जोडणारी सहा उड्डाणे रद्द करण्यात आली आहे.

घरांचे मोठे नुकसान

पश्चिम बंगाल पाठोपाठ सितरंग चक्रीवादळाने आता ईशान्येकडील काही राज्यांमध्ये कहर सुरू केला आहे. या वादळाने आसाममधील (Assam) परिस्थिती चिंताजनक झाली आहे. येथील सुमारे ८३ गावांतील ११०० हून अधिक लोकांना या चक्रीवादळाचा फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, वादळामुळे आतापर्यंत ११४६ लोकांना याचा फटका बसला आहे.

हे ही वाचा :

Back to top button