गीतेवर हात ठेवून ऋषी घेतील ब्रिटनच्या ‘पीएम’पदाची शपथ! | पुढारी

गीतेवर हात ठेवून ऋषी घेतील ब्रिटनच्या ‘पीएम’पदाची शपथ!

लंडन; वृत्तसंस्था : मूळचे भारतीय ऋषी सुनाक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार असून 28 ऑक्टोबर रोजी त्यांचा शपथविधी होणार आहे. भगवत्गीतेवर हात ठेवून ते ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतील. ऋषी सुनाक हे कृष्णभक्त असून, गीतेला ते त्यांच्या जीवनातील सर्वोच्च मार्गदर्शक मानतात. याच भगवत्गीतेवर हात ठेवून ते पंतप्रधानपद आणि गोपनीयतेची शपथ घेतील.

पहिल्यांदा 2015 मध्ये जेव्हा ते यॉर्कशायरमधील रिचमंड मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले तेव्हाही ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये त्यांनी गीतेवर हात ठेवूनच शपथ घेतली होती. 28 ऑक्टोबरला शपथविधीनंतर दुसर्‍याच दिवशी 29 ऑक्टोबरला सुनाक मंत्रिमंडळ जाहीर करण्याची शक्यता आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनाक यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राजे चार्ल्स तृतीय यांनी ऋषी सुनाक यांना नवे सरकार स्थापन करण्यासाठी मंगळवारी आमंत्रित केले. राजे चार्ल्स आणि सुनाक यांची बकिंगहॅम पॅलेसच्या कक्ष क्रमांक 1844 मध्ये भेट झाली. येथेच चार्ल्स यांनी सुनाक यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करीत असल्याचे पत्र दिले. तत्पूर्वी, माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी बकिंगहॅम पॅलेसमध्ये येऊन किंग चार्ल्स यांची भेट घेतली आणि त्यांना राजीनामा सुपूर्द केला.

सुनाक 4 वर्षांतील पाचवे पंतप्रधान ऋषी सुनाक यांच्या निवडीने नवा इतिहास रचला गेलेला असला तरी त्यांच्यासमोर आव्हानेही तेवढीच मोठी आहेत. ऋषी हे गेल्या चार वर्षांतले ब्रिटनचे पाचवे पंतप्रधान आहेत. देशावरील आर्थिक संकटामुळेच आधीच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली, हे विसरून चालणार नाही. सुनाक हे ब्रिटनला संकटाबाहेर काढतील, हा प्रचंड विश्वास हुजूर पक्षाला आणि ब्रिटनच्या जनतेला आहे. त्यावर सुनाक यांना खरे उतरावे लागणार आहे.

अक्षतामुळे आले होते अडचणीत अक्षता मूर्ती यांनी परदेशात केलेल्या कमाईवर ब्रिटनमध्ये कोणताही कर भरला नाही. यामुळे ऋषी सुनाक वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. ब्रिटनचे नागरिक नाहीत, अशांना या करातून सूट मिळते. अक्षता मूर्ती ब्रिटनमध्ये राहात असल्या तरी त्या अद्यापही भारतीय नागरिक आहेत. नियमानुसार अक्षता मूर्ती ब्रिटनमध्ये कर भरण्यास पात्र नाहीत, असा बचाव सुनाक यांनी केला होता.

देश संकटात आहे, घडी पुन्हा बसवणार : सुनाक यांचा निर्धार

बकिंगहॅम पॅलेसमधून ऋषी सुनाक पंतप्रधानांच्या अधिकृत कारमधून सरकारी निवासस्थान 10 डाऊनिंग स्ट्रीटवर पोहोचले. पंतप्रधान म्हणून देशाला उद्देशून पहिले भाषण त्यांनी केले. “सध्या देश संकटात आहे. आपण एकत्रितपणे याचा मुकाबला करू. आपली अर्थव्यवस्था सध्या अवघडलेली आहे. कोरोनामुळे आधीच खूप समस्या होत्या. पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करून त्यात भर घातली आहे. माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनीही आर्थिक संकट निवळावे म्हणून प्रयत्न केले. पण काही चुका झाल्या. त्या आपण आता सुधारणार आहोत. मी या देशाची घडी पुन्हा एकदा बसविणार आहे. हे केवळ शब्द नाहीत, हे मी करून दाखवेन. मी रात्रंदिवस काम करेन,” असा निर्धार बोलून दाखवून त्यांनी देशाला आश्वस्त केले.

हिंदू रितीरिवाजानुसार स्वागत

पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर ऋषी सुनाक यांनी आपल्या निवासस्थानी प्रवेश केला आणि हिंदू रितीरिवाजानुसार त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तेथे उपस्थित असलेल्या पुरोहितांनी त्यांना आशीर्वाद दिला. धीरगंभीर मंत्रोच्चारांच्या गजरामुळे तेथील वातावरण मंगलमय झाले होते.

अक्षताही युरोपातील सर्वाधिक श्रीमंत महिलांत

अक्षता मूर्ती-सुनाक या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्यापेक्षाही अधिक श्रीमंत आहेत. ब्रिटनच्या महाराणींकडे 460 दशलक्ष डॉलरची संपत्ती आहे, तर अक्षता यांच्याकडे इन्फोसिसच्या जवळपास एक अब्ज डॉलर समभागांची मालकी आहे. अक्षता यांचा समावेश युरोपातील सर्वाधिक श्रीमंत महिलांमध्ये केला जातो.

Back to top button