ऋषी सुनक यांना ब्रिटन जनतेच्या पसंतीची ‘ही’ आहेत चार प्रमुख कारणे | पुढारी

ऋषी सुनक यांना ब्रिटन जनतेच्या पसंतीची 'ही' आहेत चार प्रमुख कारणे

लंडन; वृत्तसंस्था :  ज्या ब्रिटिश साम्राज्यात सूर्य मावळत नव्हता, ज्या ब्रिटिश साम्राज्याने जगातील बहुतांश देशांवर हुकूमत गाजविली, ज्या ब्रिटिश साम्राज्याचा तब्बल दीडशे वर्षे भारतही एक भाग होता… त्या ब्रिटिश साम्राज्याच्या एकेकाळच्या मुख्यालयावर… ब्रिटनवर आता एका मूळ भारतीयाचे राज्य असणार आहे. इतिहास, भाग्य आणि वेळ कशी कूस बदलेल, ते सांगता येत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा नियतीने आणून दिला आहे. सोमवारी एक नवा इतिहास रचला गेला आहे. दिवाळीही खर्‍या अर्थाने उजळून निघाली आहे. ऋषी सुनाक ब्रिटनच्या पंतप्रधानपदी अखेर निश्चित झाले आहेत. भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानवर मिळविलेल्या रोमहर्षक विजयापाठोपाठ नियतीने भारताला ऋषी सुनाक यांच्या निवडीच्या रूपाने दीपोत्सवात आनंदवार्ता दिली आहे.

सोमवारी 200 खासदारांनी पाठिंबा जाहीर केल्याने सुनाक यांची हुजूर पक्षाच्या (कॉन्झर्व्हेटिव्ह) संसदीय नेतेपदी निवड झाली. सुनाक यांना आव्हान देणार्‍या पेनी मॉरडाँट यांना केवळ 26 मते मिळाली. त्यांनी अखेरच्या क्षणी आपले नाव मागे घेतले. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर याआधीही ऋषी सुनाक हेच या पदाचे सर्वाधिक प्रबळ दावेदार मानले जात होते. पण मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात लिझ ट्रस यांनी बाजी मारली होती.

सुनाक यांचा पराभव करूनच लिझ पंतप्रधान बनल्या होत्या. तेव्हाही खासदारांचे बहुमत सुनाक यांना होते. हुजूर पक्ष सदस्यांच्या मतदानात लिझ यांच्या तुलनेत सुनाक काहीसे मागे पडले होते. फार दिवसही (24-25 दिवस) या गोष्टीला उलटले नाहीत… आणि ब्रिटन आर्थिक संकटात अधिक खोल गेला. पंतप्रधान लिझ या त्यातून देशाला बाहेर काढू शकत नाही म्हटल्यावर त्यांना विरोध वाढला. अखेर 20 ऑक्टोबर रोजी लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. आता पुन्हा ऋषी सुनाक यांच्याकडे संकटमोचक म्हणून पाहिले जात आहे.

लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर बोरिस जॉन्सन, ऋषी सुनाक आणि पेनी मॉरडाँट ही तीन नावे चर्चेत आली. पण जॉन्सन हे रविवारी स्वत:च या शर्यतीतून बाहेर पडले. अर्थात तत्पूर्वी जॉन्सन यांनी सुनाक यांची भेट घेतली होती; पण चर्चेअंती सत्तेचे गणित जुळले नाही. जॉन्सन यांनी पेनी यांचीही भेट घेतली. पण उपयोग झाला नाही. जॉन्सन यांचे दोन नंबर व्हायला कुणीही तयार झाले नाही. जॉन्सन यांना 60 खासदारांचा पाठिंबा होता. संसदेत हुजूर पक्ष एकवटायला हवा, या भूमिकेवर माघारीनंतर त्यांनी भर दिला. जो निवडून येईल, त्याला आम्ही पाठिंबा देऊ, असेही जॉन्सन यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत अखेरच्या क्षणी पेनी यांनीही माघार घेतली.

पहिले मूळ भारतीय, पहिले गौरेतर, पहिले हिंदू

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी सुनाक यांच्या रूपात प्रथमच गौरेतर व्यक्ती या पदावर विराजमान होणार आहे. मूळ भारतीयच नव्हे, तर एक हिंदू व्यक्तीही या देशात पहिल्यांदा पंतप्रधान होत आहे. ब्रिटनमध्ये सध्या मूळचे पाकिस्तानी आणि मूळचे भारतीय यांच्यात तणावाची परिस्थिती आहे.

कोण आहेत ऋषी सुनाक?

ऋषी सुनाक यांचे आई-वडील भारतातील पंजाबचे मूळ रहिवासी आहेत. ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. ऋषी हे भारतीय सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. ऋषी यांच्या मातोश्री ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागात फार्मासिस्ट आहेत. ऋषी यांचा जन्म हॅम्पशायरयेथे झाला. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले. ऑक्सफर्ड विद्यापीठातून राजकारण, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. ऋषी यांचे वडीलही याच दोन्ही विद्यापीठांचे पदवीधर आहेत. ऋषी यांच्या पत्नीचे नाव अक्षता मूर्ती आहे. 2009 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. दोघांना कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ऋषी यांनी गोल्डमन सॅक्स बँक तसेच हेज फंडमध्ये या वित्तीय आस्थापनांतून मोठ्या जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. पुढे त्यांनी स्वत:चे एक गुंतवणूक प्रतिष्ठानही स्थापन केले होते. ते व्यवसायाने बँकर असून, माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.

पुढे काय?

ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून सुनाक 28 ऑक्टोबरला शपथ घेतील. नंतर 29 ऑक्टोबरला नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे.

हुजूर पक्षातील खासदार वळविण्याची ऋषी त्रिसूत्री

  • पंतप्रधानपदासाठी वारंवार होणार्‍या बदलांमुळे सत्ताधारी हुजूर (कन्झर्व्हेटिव्ह) पक्षाची प्रतिमा डागाळत चालली आहे, ही बाब सुनाक यांनी खासदारांच्या निदर्शनाला आणून दिली.
  •  मजूर (लेबर) पक्षाची लोकप्रियता 25 टक्क्यांनी वाढली आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीला दोन वर्षे बाकी आहेत. मुदतपूर्व निवडणूक आणि त्यातील विपरीत परिणामांचा इशाराही सुनाक यांनी दिलेला होता.
  •  सुनाक यांच्या नेतृत्वामुळे देशात स्थैर्य आल्यास आपापला कार्यकाळ तरी पूर्ण होईल, असा विश्वासही खासदारांत रुजविण्यात सुनाक यशस्वी ठरले.

ऋषी सुनक यांना जनतेच्या पसंतीची ही चार प्रमुख कारणे

1) कोरोना काळात ब्रिटनला आर्थिक मंदीतून बाहेर काढले
2) 2020 मध्ये हॉटेल उद्योगाला मोठी आर्थिक मदत दिली
3) कर्मचारी, कुशल कामगारांना 2021 मध्ये आर्थिक हातभार
4) कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत पर्यटन उद्योगाला पॅकेजने दिलासा

 

 

Back to top button