ब्रिटन पंतप्रधानपदी सुनक यांच्या निवडीची औपचारिकता बाकी, जॉन्सन यांची माघार | पुढारी

ब्रिटन पंतप्रधानपदी सुनक यांच्या निवडीची औपचारिकता बाकी, जॉन्सन यांची माघार

ब्रिटन पंतप्रधानपदी सुनक यांच्या निवडीची औपचारिकता बाकी

पुढारी ऑनलाईन – ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने सुनक यांची या पदासाठी निवडीची औपचारिकता बाकी आहे. ग्रेट ब्रिटनचे पहिले आशियायी पंतप्रधान ठरतील.

बोरिस यांनी माघार घेतल्याने ऋषी सुनक क्रमांक १०वर जातील, हे आता निश्चत आहे, असे वृत्त टाईमच्या वेबसाईटने दिले आहे. १०th डाऊनिंग स्ट्रीट हा ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या निवास स्थानाचा पत्ता आहे. याला क्रमांक १० म्हटले जाते. हुजुर पक्षाच्या १४० खासदारांचा सुनक यांना पाठिंबा आहे.

आयटीव्हीचे राजकीय संपादक रॉबर्ट पेस्टन यांनी ब्रिटिश इतिहासातील हा अत्यंत महत्त्वाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. ते म्हणतात, “हुजुर पक्षाचे खासदार ब्रिटिश भारतीयाची त्यांचा नेता म्हणून आणि ब्रिटनचा पंतप्रधान म्हणून निवड करतील, ब्रिटनच्या इतिहासासाठी हा अत्यंत महत्वाचा क्षण असेल.”

जॉन्सन यांनी १०० खासदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले होते, पण प्रत्यक्षात ही संख्या ५०पेक्षा जास्त नव्हती. तर दुसरीकडे पक्षांतर्गत विविध गटांनी आणि उजव्या विचारांच्या नेत्या सुएल्ला ब्रेवरमॅन यांनीही सुनक यांना पाठिंबा दिला आहे. हाऊस कॉमनमधील पक्षाच्या नेत्या पेनी मौरडाऊंट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत, पण त्यांना फक्त २८ खासदारांचा पाठिंबा आहे. जॉन्सन यांना पाठिंबा देणारे खासदार पेनी यांना मदत करतील, याची शक्यता नाही. त्यामुळे सुनक यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

सुनक पंतप्रधान झाले तर गेल्या ३ महिन्यांतील ते ब्रिटनचे तिसरे पंतप्रधान ठरतील. सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावाई आहेत. त्यांची बायको अक्षता अब्जाधिश आहे.

हेही वाचा

Back to top button