अमेरिकेच्या तिजोरीपेक्षा तिप्पट सोने भारतात | पुढारी

अमेरिकेच्या तिजोरीपेक्षा तिप्पट सोने भारतात

आज धनत्रयोदशी. या सणाला भारतात सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. भारतीय लोक या दिवशी सोने खरेदी करतात; कारण ते शुभ मानले जाते. विशेषतः, हिंदू आणि जैन संस्कृतीत प्राचीन काळापासून या ठिकाणी सोन्याची पूजा केली जाते. ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.

याच कारणामुळे भारत हा सोन्याचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक असून, चीन पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालात म्हटले आहे की, 2019 मध्ये भारतात 25 हजार टनांपेक्षा जास्त सोने घरांमध्ये होते. 2021 च्या वित्तीय सेवा विभागाच्या ट्रेझरी ब्यूरोने दिलेल्या माहितीनुसार, 8 हजार टन सोने अमेरिकेच्या तिजोरीत होते. म्हणजेच अमेरिकेच्या सरकारी तिजोरीपेक्षा जवळपास तिप्पट सोने भारतीय लोकांकडे आहे.

 

  •  भारत दरवर्षी 700 ते 1,000 टन सोने आयात करतो.
  •  भारतीयांनी घरात ठेवलेल्या सोन्याची किंमत तब्बल 125 लाख कोटी रुपये आहे.
  •  2021 मध्ये भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) 262 लाख कोटी होते. म्हणजेच जीडीपीच्या 40 टक्के सोने सध्या भारतीय लोकांकडे आहे.
  •   भारतीय मंदिरांमध्ये 4,000 टन सोन्याचा साठा आहे. हा साठा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याचे कारण म्हणजे मंदिरांना मोठ्या प्रमाणावर भक्तांकडून सोने अर्पण केले जाते.
  •   सोने उत्तम विद्युतवाहक असल्यामुळे तंत्रज्ञान उद्योगातही मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो.
  •   जर्मनी, फ्रान्स जपान यासारख्या विकसित देशांमध्येही भारताएवढा सुवर्णसाठा नाही.

  तेव्हा प्रतितोळा सोन्याची किंमत होती फक्त 96 रु.

आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सोन्याचा दर दहा ग्रॅमला 96 रुपये होता. नंतर तो झपाट्याने वाढत गेला. आता हा दर 53 हजार रुपयांच्या आसपास आहे. सणासुदीच्या हंगामामुळे तो आणखी वाढण्याची शक्यता सुवर्ण क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

 

Back to top button