आंतरराष्ट्रीय दहशतवादी शाहिद मेहमूद याची चीनकडून पाठराखण | पुढारी

आंतरराष्ट्रीय दहशतवादी शाहिद मेहमूद याची चीनकडून पाठराखण

चीनने पाकिस्तानची पाठराखण करण्याचा जणू विडाच उचलला आहे. यावर्षी चौथ्यांदा ‘ड्रॅगन’ने शाहिद मेहमूद या पाकिस्तानी दहशतवाद्याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये जागतिक दहशतवादी घोषित होण्यापासून वाचवले आहे. चीनने त्यासाठी नकाराधिकार म्हणजेच ‘व्हेटो’चा वापर केला. त्यामुळे लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी शाहिद मेहमूदला काळ्या यादीत टाकता आलेले नाही. एकीकडे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस भारत दौर्‍यावर असताना चीनने हा कोलदांडा घातला.

चीनचा कुटिल डाव

* जर शाहिद मेहमूद याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले गेले असते, तर पाकिस्तानचे नाक कापले गेले असते.
* आता तो पाकिस्तानात उजळ माथ्याने वावरू शकतो.
* चीनच्या कृतीमुळे भारत-अमेरिकेची डोकेदुखी वाढणार.

भारत-अमेरिकेचा संयुक्त प्रस्ताव

शाहिदला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी भारत आणि अमेरिकेने 1267 अल-कायदा प्रतिबंध समितीअंतर्गत हा प्रस्ताव आणला होता.

आणखी तिघांना चीनचे कवच

* अब्दुल रहमान मक्की (काश्मीरमधील हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार)
* अब्दुल रौफ अझहर (एअर इंडियाच्या विमान अपहरण कटात सहभाग)
* साजीद मीर (26/11 च्या हल्ल्यातील एक दहशतवादी. याच्यावर अमेरिकेने 41 कोटी रुपयांचे इनाम घोषित केले आहे.)

‘व्हेटो’ म्हणजे काय?

‘व्हेटो’ हा लॅटिन शब्द आहे. त्याचा अर्थ ‘मी परवानगी देत नाही.’ प्राचीन रोममधील काही निवडक व्यक्तींकडे हा अधिकार असायचा. रोमन सरकारची कोणतीही कृती थांबवण्यासाठी ते या शक्तीचा वापर करू शकत होते. तीच प्रथा संयुक्त राष्ट्रसंघात पुढे सुरू झाली. सध्या संयुक्त राष्ट्रांत अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन या देशांनाच ‘व्हेटो’चा अधिकार आहे.

Back to top button