चिनी कम्युनिस्ट अधिवेशनात गलवान धुमश्चक्रीचा व्हिडीओ! | पुढारी

चिनी कम्युनिस्ट अधिवेशनात गलवान धुमश्चक्रीचा व्हिडीओ!

बीजिंग : वृत्तसंस्था : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कार्यकाळात चीनने काय काय मर्दुमकी दाखविली, एक देश म्हणून काय काय यश मिळवले, त्याची टिमकी वाजविण्यासाठी बीजिंगमधील द ग्रेट हॉलमध्ये सुरू असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या 20 व्या अधिवेशनात गलवान खोर्‍यातील भारताविरुद्धच्या लष्करी धुमश्चक्रीचा व्हिडीओही दाखविण्यात आला!

जिनपिंग यांच्या हॉलमधील प्रवेशापूर्वी त्यांच्या गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा व्हिडीओच्या माध्यमातून उपस्थित 2300 वर पक्ष सदस्यांना दाखवून ‘एन्ट्री’ला साजेसे वातावरण तयार करण्यात आले. जून 2020 मध्ये लडाखमधील गलवान खोर्‍यात भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान झालेली हिंसक धुमश्चक्रीही दाखविली गेली.

गलवान चकमकीत चीनच्या बाजूने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणारे चिनी लष्करी कमांडर की फाबाओ यालाही या बैठकीत खास बोलाविण्यात आले होते. फाबाओचा या अर्थाने जिनपिंग यांच्याकडून हा दुसरा गौरव होता. गतवर्षी बीजिंगमध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिक मिरवणुकीच्या टॉर्च रिलेमध्येही की फाबाओला विशेष संधी देण्यात आली होती. फाबाओ हा या मिरवणुकीत ‘टॉर्च बेअरर’ (मशालधारक) होता. भारतासोबतच इतर काही देशांनीही या प्रकाराला आक्षेप घेतला. भारताने तर उद्घाटन समारंभावरच बहिष्कार टाकला होता.

दहा वर्षांत काय उजेड पाडला?

अर्ध्या तासाच्या या व्हिडीओत जिनपिंग यांनी गेल्या 10 वर्षांत काय उजेड पाडला, त्याचा लेखाजोखा होता. गलवान चकमकीसह चीनचा अंतराळ कार्यक्रम, नवीन प्रवासी जेट आणि कोरोना प्रतिबंध या बाबींचा आवर्जून उल्लेख या व्हिडीओत होता.

Back to top button