Xi Jinping : हाँगकाँगप्रमाणे तैवानवरही पूर्ण कब्जा करणार : चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष जिनपिंग | पुढारी

Xi Jinping : हाँगकाँगप्रमाणे तैवानवरही पूर्ण कब्जा करणार : चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष जिनपिंग

पुढारी ऑनलाईन डेस्क : आम्ही हाँगकाँगवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. त्याप्रमाणे आम्ही तैवानवरही पूर्णपणे नियंत्रण मिळविण्याबाबत ठाम आहोत, असे स्पष्ट करत कोणत्याही एकतर्फीवाद, संरक्षणवाद आणि गुंडगिरीला तीव्र विरोध करण्याचे आवाहन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping)  यांनी रविवारी (दि.१६) केले. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) च्या २० व्या राष्ट्रीय काँग्रेसची बैठक आजपासून सुरू झाली. यावेळी बीजिंगच्या ग्रेट हॉल ऑफ द पीपलमध्ये पक्षाच्या प्रतिनिधींसमोर जिनपिंग बोलत होते.

आम्ही तैवानला आमचा भाग मानतो

या वेळी जिनपिंग (Xi Jinping)  म्हणाले की, चीनने तैवानच्या फुटीरतावादाच्या विरोधात मोठा संघर्ष केला आहे. आम्ही तैवानच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आणि तेथील परकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. आम्ही तैवानला आमचा भाग मानतो. ते आमच्यासोबत सामील होऊ शकतात. आम्ही प्रादेशिक अखंडतेला विरोध करण्यासाठी दृढनिश्चय आणि सक्षम आहोत. हाँगकाँगमधील परिस्थितीने अराजकतेतून शासन बदल घडवून आणला आहे. आम्ही एका नवीन प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संबंधांच्या निर्मितीला प्रोत्साहन देत आहोत, जे जागतिक शासन प्रणाली सुधारण्यात आणि तयार करण्यात सक्रिय भूमिका बजावेल. आगामी काळात चिनी मार्क्सवादाचे नवे क्षेत्र खुले होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शी जिनपिंग म्हणाले, ‘नव्या शतकात पक्ष आणि देशाला पुढे नेण्यासाठी आम्ही ठोस रणनीती तयार केली आहे. आम्ही प्रबळ राजकीय इच्छाशक्तीने राजकीय सुधारणा मजबूत केल्या आहेत. ज्याचे परिणाम अनेक क्षेत्रांत दिसून येत आहेत. आमच्याकडे जगातील सर्वात मोठ्या शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा आहेत. आम्ही लोकांच्या सुरक्षिततेचे आणि आरोग्याचे सर्वोच्च पातळीवर संरक्षण केले आहे. कोरोना महामारीच्या काळात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांचे जीवन वाचविण्यास आम्ही प्राधान्य दिले.

दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जिनपिंग यांचा कार्यकाळ या महिन्यात संपणार आहे. आजपासून सुरू झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत आगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून जिनपिंग यांच्या तिसऱ्या कार्यकाळावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. 69 वर्षीय जिनपिंग यांच्याबाबत सर्व काही योजनेनुसार चालले आहे. माओ झेडोंग यांच्यानंतर चीनचे सर्वात शक्तिशाली नेते म्हणून त्यांचे स्थान मजबूत करून या बैठकीनंतर पक्षाचे सरचिटणीस म्हणून पुन्हा त्यांची निवड केली जाईल.

हेही वाचलंत का ? 

Back to top button