अरुणाचलजवळ रेल्वेमार्गाचे काम सुरूच ठेवा; शी जिनपिंग यांचे आदेश | पुढारी

अरुणाचलजवळ रेल्वेमार्गाचे काम सुरूच ठेवा; शी जिनपिंग यांचे आदेश

बीजिंग : वृत्तसंस्था

चीनच्या सिचुआन या नैऋत्येकडील प्रांतापासून ते चीनव्याप्‍त तिबेटमधील लिंझी भागापर्यंतच्या रेल्वेमार्गाचे बांधकाम पूर्ववत सुरू करण्याचे आदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बांधकाम विभागाला रविवारी दिले. मध्यंतरी हे काम बंद ठेवण्यात आले होते. प्रस्तावित रेल्वेमार्ग भारताच्या अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेजवळून जाणार असल्याने भारतासाठी ती मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

प्रकल्पावर चीन सुमारे 47.8 दशलक्ष डॉलर खर्च करणार असून, या प्रकल्पावरून भारत-चीन तणावात वाढ होण्याची शक्यता आहे. क्युंघाई-तिबेट रेल्वे प्रकल्पानंतर सिचुआन-तिबेट रेल्वे प्रकल्प हा तिबेटशी संबंधित चीनचा दुसरा रेल्वे प्रकल्प आहे. क्युंघाई-तिबेट पठाराच्या नैऋत्य भागातून हा मार्ग जाणार आहे. चिनी माध्यमांतून याबाबतचे विस्तृत वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

तिबेटच्या लिंझी भागाशी उर्वरित चीनला जोडणारा हा रेल्वेमार्ग असेल.  लिंझी भागाला ‘नाईंग्झी’ही म्हटले जाते. लिंझी भाग अरुणाचल प्रदेशपासून जवळ आणि सीमेला लागून आहे. जिनपिंग यांनी या रेल्वेमार्गाबाबतची जी महिमा चीनवासीयांना उद्देशून गायली आहे, त्यावरूनच हा मार्ग भारताच्या जीवावर उठणार आहे, याचे संकेत मिळाले आहेत. सिचुआन-तिबेट रेल्वे प्रकल्प चीनच्या सीमेच्या सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावेल, असे जिनपिंग यांनी म्हटलेले आहे. 

Back to top button