Facebook कर्मचार्‍यांना काढून टाकण्याच्या तयारीत, 12,000 लोकांची नोकरी कधीही जाण्याची शक्यता : अहवाल | पुढारी

Facebook कर्मचार्‍यांना काढून टाकण्याच्या तयारीत, 12,000 लोकांची नोकरी कधीही जाण्याची शक्यता : अहवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेटा (Meta) अर्थात फेसबुकमधून (Facebook) मोठ्या प्रमाणात कर्मचा-यांना काढून टाकण्यात येणार असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. येणा-या काही दिवसातच यावर कार्यवाही होईल, अशी माहिती सूत्रांकडून समजते आहे. इनसाइडरच्या अहवालानुसार, वरिष्ठ अधिकारी खराब कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी करत आहेत. अनेक कर्मचार्‍यांनी इनसाइडरला सांगितले की पुढील काही आठवड्यांत कर्मचार्‍यांमध्ये 15 टक्के कपात केली जाऊ शकते. याचा अर्थ फेसबुकच्या 12,000 कर्मचाऱ्यांना लवकरच आपली नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे.

सोशल नेटवर्किंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी मेटा अर्थात फेसबुकच्या (Facebook) कर्मचाऱ्यांवर काही महिन्यांपासून कपातीची टांगती तलवार आहे. फेसबुकने याआधीच नविन कर्मचारी भरती थांबवली आहे. मेटाच्या शेअरची किंमत प्रति शेअर $ 380 च्या जवळ पोहोचली असून गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरमध्ये 60 टक्क्यांनी घसरण झाली आहे. मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सर्व विभागांमधील नोकरभरती बंदी थांबवल्याचे स्पष्ट केले आहे. यासोबतच कर्मचा-यांमध्ये आणखी कपात लवकरच होणार असल्याचा इशाराही दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, झुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना कंपनीतील अंतर्गत बैठकीत व्हर्च्युअल मीटींमध्ये या गोष्टी सांगितल्या.

एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, फेसबुक (Facebook) येत्या काही आठवड्यांत कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणार आहे. मुल्यांकनाच्या आधारे कर्मचा-यांची विभागणी केली जाणार आहे. जे कर्मचारी आपल्या कामात कमी दिसतील त्यांना प्राधान्यक्रमाने नोकरीवरून कमी केले जाईल. अशा कर्मचा-यांचा ‘नीड्स सपोर्ट’ श्रेणीच्या यादीत समावेश केला जाईल आणि नोकरी सोडण्यासाठी 30 दिवसांचा अवधी दिला जाईल.

‘नीड्स सपोर्ट’ श्रेणीच्या यादीत आल्यानंतर कर्मचाऱ्यांचा ‘परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन (PIP)’ मध्ये समावेश केला जाईल आणि विशिष्ट वेळेत निर्दिष्ट लक्ष्य पूर्ण करण्यास सांगितले जाईल. अहवालानुसार, पीआयपी दरम्यान केवळ काही कर्मचारीच त्यांचे लक्ष्य पूर्ण करू शकतात आणि जे अपयशी ठरतात त्यांना नोकरी गमावावी लागते.

Back to top button