या वर्षीही अमेरिकेत दिवाळी साजरी होणार, व्हाईट हाऊस उजळणार | पुढारी

या वर्षीही अमेरिकेत दिवाळी साजरी होणार, व्हाईट हाऊस उजळणार

पुढारी ऑनलाईन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यंदाही व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करणार आहेत. त्यांच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. मात्र, त्याचे आयोजन कधी होणार हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी कॅरेन जीन-पियरे यांनी त्यांच्या नियमित पत्रकार परिषदेत सांगितले की, यावेळी त्यांच्याकडे तारखेची माहिती नाही. परंतु राष्ट्रपतींना वाटते की भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी मजबूत करण्याची ही एक महत्त्वाची संधी आहे.

जॉर्ज बुश यांच्या कार्यकाळात झाली होती सुरुवात

जॉर्ज बुश यांच्या काळापासून व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची पद्धत सुरू झाली. दिवाळीचा प्रकाश आपल्याला अंधारातून ज्ञानाकडे आणि एकतेकडे नेण्याचा संदेश देतो, असे बायडेन यांनी गेल्या वर्षी आपल्या दिवाळी संदेशात म्हटले होते. दरम्यान, मेरीलँडचे गव्हर्नर लॉरेन्स हॉगेन यांनी ऑक्टोबर हा हिंदू हेरिटेज महिना घोषित केला आहे. यापूर्वी अमेरिकेतील टेक्सास, फ्लोरिडा, न्यू जर्सी, ओहायोसह अनेक राज्यांनी ऑक्टोबरला हिंदू वारसा महिना म्हणून घोषित केले आहे. हिंदू धर्माने आपल्या अनोख्या इतिहास आणि वारशातून अमेरिकेला मोठे योगदान दिले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. न्यूयॉर्कमध्ये भारताचे कौन्सिल जनरल रणधीर जैस्वाल म्हणाले की, संपूर्ण अमेरिकेत दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जातो.

Back to top button