Pakistan Economic Crisis : श्रीलंकेनंतर पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात, पेट्रोल २३७ रुपये लिटर, गव्हाचा आटा १२५ रुपये किलो | पुढारी

Pakistan Economic Crisis : श्रीलंकेनंतर पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात, पेट्रोल २३७ रुपये लिटर, गव्हाचा आटा १२५ रुपये किलो

इस्लामाबाद : श्रीलंकेनंतर आता पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती (Pakistan Economic Crisis) बिघडत चालली आहे. पाकिस्तानातील लोकांना वाढत्या महागाईत आता आणखी एका झटका बसला आहे. पाकिस्तानातील शहबाज शरीफ यांच्या सरकारने बुधवारी पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर १.४५ रुपयाने वाढ केली. यामुळे येथील पेट्रोलचा प्रति लिटर दर २३७.४३ रुपयांवर पोहोचला आहे. पेट्रोलसह जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे येथील लोकांचा जगणे मुश्किल झाले आहे.

पाकिस्तान सरकारच्या वित्त विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पेट्रोलचा दर प्रति लिटर २३५.९८ रुपयांवरून २३७.४३ रुपयांवर गेला आहे. दरम्यान, पेट्रोलचा दर वाढवला असला तरी लाइट डिझेलचा दर ४.२६ रुपयांनी कमी केला आहे. यामुळे येथे आजपासून लाइट डिझेलचा दर १९७.२८ रुपये राहणार आहे. केरोसीनचा दर ८.३० रुपयांनी कमी केला आहे. तर हायस्पीड डिझेलच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही.

आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमतीतील चढ-उतार यामुळे पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्याचा दावा पाकिस्तान सरकारकडून केला जात आहे. त्यात पाकिस्तानात महापुराचे संकट आहे. यामुळे देशातील मोठा भूभाग पाण्याखाली गेला आहे. आतापर्यंत महापुरामुळे १,५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३.३० कोटी लोक प्रभावित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात चलन तुटवड्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. (Pakistan Economic Crisis)

गव्हाचा आटा प्रति किलो १२५ रुपये

पाकिस्तानातील कराची शहरात गव्हाच्या आट्याची (गव्हाच्या पिठाची) किंमत प्रति किलो १२५ रुपये झाली आहे. ६ ते ७ महिन्यापूर्वी ही किंमत २५ रुपये प्रति किलो होती. एका रिपोर्टनुसार, पाकिस्तान सांख्यिकी ब्युरोने म्हटले आहे की १५ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात गव्हाच्या आट्याच्या किमतीत ७.५१ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे गव्हाच्या आट्याची किंमत आता १०६.३८ रुपये प्रति किलो झाली आहे. पाकिस्तानात गेल्या तीन महिन्यांत गव्हाच्या किमतीत ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.

हे ही वाचा :

Back to top button