

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तान चीनच्या बाजूने झुकलेला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये अनेक विषयांवरून संघर्ष आहे. चीनच्या बँकांनी जून 2022 मध्ये पाकिस्तानला 18.28 हजार कोटी रुपयांची मदत दिली होती. आता चालू सप्टेंबर महिन्यात एफ-16 ही लढाऊ विमाने अद्ययावत करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानच्या हवाई दलाला 3.58 हजार कोटी रुपये दिले आहेत.
भीषण आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला आता चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांकडून पैसा मिळत आहे, हेच यातून दिसते. पाकिस्तान हा चीनचा आशिया खंडातील सर्वात मोठा कर्जदार आहे. पाकिस्तानवर एकूण 6.97 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. दिवसेंदिवस चीनच्या आहारी जात असलेल्या पाकिस्तानला आपल्या बाजूने वळवण्यासाठी अमेरिकेने ही नवी मदत केली आहे. अमेरिकेने आपले सरकार पाडण्यासाठी नवाज शरीफ यांना मदत केल्याचा आरोप इम्रान खान यांनी पदच्युत होताना केला होता. तसेच सत्तेत आल्यानंतर नवाज शरीफ यांचे बंधू तसेच पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी वाईट काळात वेळोवेळी साथ दिल्याबद्दल अमेरिकेचे ऋण व्यक्त केले होते. अमेरिकेचे पाकिस्तानबाबत बदललेले धोरण अकारण नाही. त्यामागे शरीफ कुटुंबाची अमेरिकेशी असलेली जवळीक असल्याचे सांगितले जाते. ट्रम्प यांना शह देण्यासाठी बायडेन यांची ही खेळी असल्याचेही सांगण्यात येते.
अद्ययावतीकरणानंतर पाकच्या एफ-16 लढाऊ विमानांची क्षमता वाढणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाकची ही विमाने भारताच्या खिजगणतीतही नव्हती; आता मात्र ती टक्कर देण्यालायक होतील.