

लंडन ः वृत्तसंस्था ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी शाही इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असून, त्यावेळी देशोदेशीचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. 17 ते 19 सप्टेंबर या कालावधीत वेस्टमिनिस्टर हॉलमध्ये महाराणींचे पार्थिव ठेवले जाईल. तेथे ब्रिटनवासी त्यांचे अंतिम दर्शन घेणार आहेत. त्यानंतर शोकसभा होईल. 19 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शोकसभेचा असेल. या दिवशी संपूर्ण ब्रिटनमध्ये दोन मिनिटांचे मौन पाळले जाणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार केले जातील.
एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी अर्थात महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी मेफेअर, लंडन येथे झाला होता. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे गुरुवारी त्यांचे निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या. विंडसर कोर्ट येथे एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी यांचा राज्याभिषेक सोहळा 1953 मध्ये झाला. ब्रिटिश सिंहासनावर विराजमान होणार्या त्या सहाव्या महिला होत्या. 2 जून 1953 रोजी राणी एलिझाबेथ सिंहासनावर विराजमान झाल्या होत्या.
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या निधनाबद्दल भारतात 11 सप्टेंबर रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार असून, त्यानिमित्त सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहेत.
महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी गुरुवारी जगाचा निरोप घेतला आणि येत्या 19 रोजी त्यांच्यावर शाही इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सध्या लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसच्या परिसरात उभारलेल्या शामियान्यात विविध स्वरूपाच्या प्रार्थना सभा घेतल्या जात आहेत. यातील लक्षवेधी ठरलेली प्रार्थना सभा म्हणजे सेंट जेम्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खड्या सुरात म्हटलेले संस्कृत श्लोक… 'श्री गुरुभ्योनमः, हरिओम' असे स्वर उमटताच सारे वातावरण भक्तिमय झाले. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, त्याला असंख्य लाईक्स मिळत आहेत. लक्षात घ्या, ज्या ब्रिटिश महाराणींनी भारताला अनेक वर्षे गुलामगिरीत ठेवले त्यांना अंतिम निरोप देताना, भारताचा संपन्न वारसा असलेल्या संस्कृत श्लोकांचे त्या ठिकाणी पठण झाले आणि तेसुद्धा ब्रिटनमधील शालेय मुलांकडून, हे विलक्षणच म्हटले पाहिजे. तमाम भारतीयांसाठी ही अभिमानाची आणि तेवढीच गौरवाची बाब होय.