Queen Elizabeth Death : “७० वर्ष एकटेपण सोसलेल्या एलिझाबेथ….” राज ठाकरेंकडून एलिझाबेथ यांना श्रद्धांजली | पुढारी

Queen Elizabeth Death : "७० वर्ष एकटेपण सोसलेल्या एलिझाबेथ...." राज ठाकरेंकडून एलिझाबेथ यांना श्रद्धांजली

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth IIयांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. (Queen Elizabeth Death स्कॉटलंडमधील बालमोरल वाड्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राणी एलिझाबेथ यांच्यानंतर आता राजेशाही प्रिन्स चार्ल्स (Prince Charles) यांच्या हाती आली असून ते ब्रिटनचे नवे राजे आहेत.  आपल्या ७० वर्षांच्या कारकिर्दीत  अनेक देशांचा इतिहास बदलताना पाहिलेल्या,  तंत्रज्ञानापासून राजकारणापर्यंतचे जग बदलले याच्या  साक्षीदार असलेल्या राणी एलिझाबेथ यांना जगभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Queen Elizabeth Death : कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहले आहे की,

“ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचं निधन झालं. ७० वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही ७० वर्ष कुठली ? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची ७० वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ २ ह्यांच्यामुळे.

 

ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? मुळात त्यांची गरज आहे का? असा विचार एका बाजूला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाच्या विन्स्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानाला हाताळायचं, तर पुढे कमालीच्या स्वतंत्र बुद्धीच्या समवयस्क मागरिट थॅचर ह्यांच्याशी कितीही खटके उडाले तरी स्वतःचा इगो बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय ह्यांनी दाखवलं. आणि म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दशः ब्रिटिश राज्यघराण्याचं खाजगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लॉइड्सनी चव्हाट्यावर आणून सुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं.

कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण ७० वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ २ यांच्या शिरावरून हा मुकुट उतरला. एलिझाबेथ २ यांचं एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरु होतंय ? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं कुतूहलाच असेल. एलिझाबेथ २ यांच्या स्मृतीस अभिवादन.”

हेही वाचलंत का?

Back to top button