रशियाच्या तेलसम्राटाचा संशयास्पद मृत्यू | पुढारी

रशियाच्या तेलसम्राटाचा संशयास्पद मृत्यू

मॉस्को ; वृत्तसंस्था : रशियातील तीन लाख कोटी रुपयांहून अधिक भागभांडवल असलेली सर्वात मोठी खासगी तेल कंपनी लुकॉईलचे चेअरमन राविल मॅगानोव्ह यांचा गुरुवारी मृत्यू झाला. 67 वर्षीय राविल यांनी रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावरून खिडकीतून उडी मारली. यात त्यांचा मृत्यू झाला. तथापि, राविल यांनी युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध केला होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा आहे.

राविल हे मॉस्कोतील सेंट्रल क्लिनिकल हॉस्पिटल येथे हृदयाशी संबंधित नेहमीच्या तपासणीसाठी दाखल झाले होते. मध्य मॉस्कोतील या रुग्णालयात हायप्रोफाईल रुग्ण येत असतात. सोव्हिएत संघाचे अखेरचे राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह निधनाआधी येथेच होते. त्यामुळे येथे सुरक्षाव्यवस्था चोख असते. राविल डिप्रेशनचीही समस्या होती. राविल यांचा वॉर्ड जिथे होता तेथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील सीसीटीव्ही बंद होते.

रशियातील प्रसारमाध्यमांमध्ये राविल मॅगानोव्ह हे धूम्रपानासाठी रूमबाहेर आले आणि त्यांनी खिडकीतून उडी मारली, असे म्हटले आहे. खिडकीत सिगारेटचे पाकीटही आढळून आल्याचा दावा केला गेला आहे. तथापि, त्यांच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही.

राविल हे एकमेव असे उद्योगपती होते ज्यांनी पुतीन यांच्यावर युक्रेनवर हल्ल्यावरून टीका केली होती. मार्चमध्ये त्यांनी हा हल्‍ला दुःखद असून युद्ध संपविण्याचे आवाहन केले होते. लुकॉईल ही कंपनी जगातील बड्या ऊर्जा कंपन्यांपैकी एक आहे. ते क्रेमलिनशी प्रामाणिक होते; पण पुतीन यांच्यावरील टीकेनंतर समीकरणे बदलल्याचे सांगितले जात आहे.

संशयास्पद मृत्यूंचे सत्र

यापूर्वी एप्रिलमध्येही गॅस कंपनी सर्गेई प्रोटोसेन्याचे माजी व्यवस्थापक नोवाटेक हे पत्नी आणि मुलीसह मृतावस्थेत आढळले होते. त्याच महिन्यात एका खासगी बँकेचे उपाध्यक्ष व्लादिस्लाव एवायेव हेदेखील पत्नी आणि मुलीसह मृतावस्थेत आढळून आले होते. मेमध्ये लुकॉईलचे माजी व्यवस्थापक अलेक्झांडर सुबोटिन यांचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वीच क्रेमलिन समर्थक पत्रकार दरिया दुगिना यांचीही हत्या झाली आहे.

Back to top button