अणुयुद्ध झाल्यास उपासमारीने मरतील जगातील 500 कोटी लोक | पुढारी

अणुयुद्ध झाल्यास उपासमारीने मरतील जगातील 500 कोटी लोक

नवी दिल्ली; जाल खंबाटा : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबताना दिसत नाही. त्यामुळेच जगावर सातत्याने अणू युद्धाचे (Nuclear War) संकट घोंघावत आहे. त्यातच एका नव्या अभ्यासाने जगाला चिंतेत टाकणारा इशारा दिला आहे. या अभ्यासानुसार आजच्या काळात रशिया आणि अमेरिका यांच्यात पूर्ण क्षमतेने अणुयुद्ध झाले, तर जगात पाच अब्ज लोकांचा मृत्यू होईल. अर्थात, हे मृत्यू थेट अणुबॉम्बमुळे होणार नाहीत, तर उपासमारीने  (starvation) होतील.

अमेरिका आणि रशिया या दोन देशांतील अणुयुद्धाबाबत हा नवा अभ्यास आहे. या अभ्यासातील निष्कर्ष अत्यंत धक्कादायक आहेत. या अभ्यासात म्हटले आहे की, जर या दोन देशांमध्ये अणुयुद्ध झाले, तर 5 अब्ज लोकांचा मृत्यू उपासमारीने होईल आणि त्याचे महत्त्वाचे कारण असेल सनलाईट ब्लॉकेज. म्हणजेच सूर्यकिरणे पृथ्वीपर्यंत न आल्याने पृथ्वीवर शेतीच पिकू शकणार नाही.

अमेरिकेतील रटजर्स विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला आहे. त्यात जगभरातील सहा संभाव्य अणुयुद्धांमुळे होणार्‍या परिणामांचा विचार केला आहे. हे संशोधन ‘फूड’ या पत्रिकेत प्रकाशित झाले आहे. रशिया आणि अमेरिकेत अणुयुद्ध झाल्यास मानवजातच नष्ट होऊन जाईल. अणुबॉम्बच्या विस्फोटामुळे काळोख निर्माण होईल. धुळीचे साम्राज्य पृथ्वीसभोवतालच्या वातावरणात भरून राहील. अमेरिका, रशिया या सर्वात मोठे निर्यातदार देश निर्बंध लागू करतील. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील देशांमध्ये मोठे खाद्यसंकट निर्माण होईल. पृथ्वीभोवतीचे वातावरण गरम झाल्याने ओझोन नष्ट होईल. अन्ननासाडी टाळणे, जनावरांच्या चार्‍यासाठी असलेल्या पिकांचा वापर करणे यातूनही दिलासा मिळणार नाही.

भारत-पाकिस्तान अणुयुद्धाने काय होईल?
अभ्यासकांनी सेंटर फॉर अ‍ॅटमॉस्फेरिक रिसर्चच्या एका जलवायू अंदाज उपकरणाचा वापर करून प्रत्येक देशातील प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा अंदाज वर्तवला आहे. मोठ्या युद्धाचे परिणामही मोठे असतील. जगभरात खाद्य संकटाचे भयकारी परिणाम दिसतील. केवळ भारत-पाकिस्तान (India-Pakistan)या देशातील छोट्या अणुयुद्धानेही (Nuclear War) पाच वर्षांत जगातील एकूण शेतमाल उत्पादनात 7 टक्के घट होईल. रशिया आणि अमेरिका यांच्यातील अणुयुद्धाने तीन ते चार वर्षांत शेती उत्पादनात 90 टक्के घट होईल.

विद्यापीठातील संशोधक प्रा. अ‍ॅलन रोबॉक म्हणाले, अण्वस्त्रे असतील, तर त्याचा उपयोगही केला जाऊ शकतो. जग अनेकदा अणुयुद्धाच्या जवळ आले आहे. अण्वस्त्रांवर बंदी घालणे हाच एकमेव दीर्घकालीन उपाय आहे. संयुक्त राष्ट्राच्या पाच वर्षांपूर्वीच्या कराराला 66 देशांनी मंजुरी दिली आहे; मात्र अण्वस्त्रसंपन्न 9 देशांनी त्यावर सही केलेली नाही. त्या नऊ देशांनीही या करारावर सही करण्याची वेळ आली आहे. कोणत्याही स्थितीत अणुयुद्ध रोखले पाहिजे.
– प्रा. अ‍ॅलन रोबॉक,
संशोधक, रटजर्स विद्यापीठ, अमेरिका

Back to top button