नेताजींच्या अस्थी जपानहून भारतात परत आणा, अन् गंगेत विसर्जित करा : अनिता बोस | पुढारी

नेताजींच्या अस्थी जपानहून भारतात परत आणा, अन् गंगेत विसर्जित करा : अनिता बोस

बर्लिन; वृत्तसंस्था : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जर्मनीत राहात असलेल्या अनिता बोस या कन्येने नेताजींच्या अस्थी भारतात परत आणण्याची विनंती भारत सरकारकडे केली आहे. नेताजींच्या अस्थींचा काही भाग गंगा नदीत विसर्जित करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

अनिता बोस यांच्या माहितीनुसार, नेताजींचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवानमध्ये विमान अपघातात झाला. सप्टेंबर 1945 पासून त्यांच्या अस्थी टोकिओच्या रेन्कोजी मंदिरात जतन करण्यात आल्या आहेत. जपान सरकारकडेही अनिता बोस यांनी अस्थी परत करण्याची मागणी केली आहे. स्वतंत्र भारतात परतण्याची माझ्या पित्याची इच्छा दुर्दैवाने पूर्ण झाली नाही. त्यांच्या अवशेषांना किमान स्वतंत्र भारताच्या मातीचा स्पर्श होऊ द्या, असे साकडे अनिता बोस यांनी दोन्ही सरकारांना घातले असून, नेताजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांची सनातन धर्मावर श्रद्धा होती. त्यामुळे त्यांच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित करणे हिंदू प्रथेनुसार ठरेल, असेही अनिता बोस यांनी म्हटले आहे.

तैवान येथे विमान अपघातानंतर नेताजींचा मृत्यू आणि त्यांचे अवशेष टोकिओला कसे नेले त्याचा पुरावा देणारी काही कागदपत्रे अलीकडेच आशिश रे यांच्या पुस्तकात प्रसिद्ध झाली आहेत. या पार्श्वभूमीवर अनिता बोस यांनी नेताजींच्या अवशेषांचा डीएनए चाचणीसाठीची तयारीही दर्शविली आहे. मंदिरातील पुजारी आणि जपान सरकारचीही या चाचणीला हरकत नाही. नेताजींचे अवशेष भारताकडे सुपूर्द करण्याची त्यांची तयारी असल्याचेही अनिता बोस यांनी सांगितले. भारत सरकारने अधिकृतपणे त्यासाठी आपली मागणी जपानकडे नोंदवावी, अशी मागणी अनिता बोस यांनी केली आहे.

Back to top button