मृत्युचे कोडे उलगडणार? मृत डुकरात रक्तप्रवाह सुरू करण्यात यश | पुढारी

मृत्युचे कोडे उलगडणार? मृत डुकरात रक्तप्रवाह सुरू करण्यात यश

पुढारी ऑनलाइन डेस्क : येल विद्यापीठातील संशोधकांनी एका तासांपूर्वी मृत झालेल्या डुकरात रक्तप्रवाह आणि इतर पेशींचे कार्य सुरू करण्यात यश मिळवले आहे. मृत्यूनंतर पेशी लगेच मृत होत नाहीत, असे निर्देश करणारे हे संशोधन आहे. या संशोधनामुळे भविष्यात मृत माणसांतील विविध अवयव जास्त काळापर्यंत जतन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे जास्त व्यक्तींना अवयव दान करता येणार आहेत. हृदयाचे कार्य थांबल्यामुळे या डुकराचा मृत्यू झाला होता. या संशोधकांनी Organ Ex नावाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. याच्या मदतीने या मृत डुकाराच्या शरीरातील सर्व पेशींत ऑक्सिजन प्रवाहित करण्यात आला.

“एक तासानंतर या डुकराच्या पेशी कार्यरत होत्या. खरे तर असे व्हायला नको होते. यातून असे लक्षात येते की पेशींचा मृत्यू आपण रोखू शकतो आणि महत्त्वाच्या अवयवांना कार्यरत ठेवता येऊ शकते,” अशी माहिती या विद्यापीठातील संशोधक डॉ. नेनाद सेस्टन यांनी दिली.
Organ Ex या तंत्रात एक प्रकारचे द्रव्य आणि रक्त डुकराच्या रक्तवाहिन्यातून सोडण्यात आले. या द्रव्यात कृत्रिम हिमोग्लोबिन, इतर काही घटक आणि रक्त गोठू नये म्हणून आवश्यक ते रेणू यांचा समावेश करण्यात आला होता.

या उपचारानंतर सहा तासांनंतरही विविध अवयवांतील पेशींतील कार्य सुरू असल्याचे संशोधकांना दिसून आले. या अवयवांत हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि इतर अवयवांचा समावेश होता. हे संशोधन अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. संशोधकांना असे वाटते की त्यांचे संशोधन अंतिमतः माणसांतही उपयोगी पडेल. अवयव प्रत्यरोपणाची गरज जगातील लाखो लोकांना आहे, त्यांना या संशोधनाचा लाभ होणार आहे.

हेही वाचा

Back to top button