Trump Attack Conspiracy | ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यास २७ वर्षांची शिक्षा

ज्यांना सुपारी दिली ते निघाले एफबीआयचे भूमिगत एजंट; पाकचा नागरिक
Trump Attack Conspiracy |
Trump Attack Conspiracy | ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यास २७ वर्षांची शिक्षा
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पाकिस्तानी नागरिक आसिफ मर्चंट (४८) याला अमेरिकेतील न्यायालयाने २७ वर्षे आणि ६ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

ब्रुकलिन येथील फेडरल न्यायालयाने दहशतवादी कट आणि सुपारी देऊन हत्या घडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मर्चंटला दोषी ठरवले. या कटात ट्रम्प यांच्यासह तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांचीही संभाव्य लक्ष्य म्हणून नावे समोर आली होती.

सूड घेण्याचा हेतू

अमेरिकी तपासानुसार, या कटामागे इराणचे माजी आयजीसी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्याची भावना होती. जानेवारी २०२० मध्ये इराकमध्ये अमेरिकी ड्रोन हल्ल्यात सुलेमानी मारले गेले. मर्चंट २०२२ च्या सुमारास आयआरजीसीच्या संपर्कात आला. धार्मिक यात्रेसाठी इराणला गेला असताना त्याची युसूफ मेरहरदाद नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. दीड वर्षात दोघे १५ वेळा भेटले.

पाच हजार डॉलरची सुपारी

एप्रिल २०२४ मध्ये इराणमध्ये आठवडाभर राहिल्यानंतर मर्चंट अमेरिकेत दाखल झाला. तेथे त्याने हत्येच्या कटासाठी काही लोकांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका परिचिताने एफबीआयला माहिती दिली. मर्चंटने ज्या व्यक्तींना मारेकरी समजून संपर्क साधला, ते प्रत्यक्षात एफबीआयचे अंडरकव्हर एजंट होते. तीन वेळा भेट घेत मर्चंट याने एका राजकीय नेत्याची हत्या घडवण्याची योजना सांगितली. यासाठी पाच हजार डॉलर (सुमारे ४.४ लाख रुपये) आगाऊ दिले होते. तो २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर आणि ट्रम्प यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. १२ जुलै २०२६ रोजी अमेरिकेबाहेर जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.